रोहित पवारांनी कार्यकर्त्यांकडे मागितले ‘ते’ खास बर्थ-डे गिफ्ट

बारामती – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा 29 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. पण, करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना एक खास आवाहन केले आहे.

रोहित पवार म्हणाले कि, वाढदिवसानिमित्त बॅनर, बुके, केक यावर खर्च करण्यापेक्षा सध्याच्या संकटाच्या काळात सामाजिक भान जपावे. करोनाच्या संकटामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, अनेकांकडे सुविधा उपलब्ध नाहीत. अशा मुलामुलींना मदत करता येईल का? त्यांच्यासाठी खर्च करता येईल का? गरजू विद्यार्थ्यांना स्मार्टफोन घेऊन देता येईल का? दहावी, बारावी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक शुल्काचा भार उचलता येईल का? याचा विचार करावा. काही कारणास्तव नैराश्य आलेल्या तरुणांना आधार देण्याचा विचार करावा.

हे मी केवळ तुम्हालाच सांगतो आहे असे नाही. शक्य तेवढे मी स्वत: करत आहे. बारामतीतील शारदानगर संकुलातील १०० मुलींच्या शिक्षणाचा यंदाचा खर्च उचलण्याचा संकल्प मी माझ्या वाढदिवसानिमित्ताने  केला आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

तसेच, करोनाच्या काळात अनेक लोक तणावाखाली जातात. अशा लोकांना आर्थिक आणि मानसिक मदत करावी. नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा. सध्या युवावर्गासमोर अडचणी आणि संधीही आहे. या अडचणी समजून घेऊन संधीचे सोने कसे करावे, याचा विचार करावा.

करोना झालेल्या व्यक्तीसह त्यांचं कुटुंबही तणावाखाली असते. अशा कुटुंबांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करावा. तसेच, करोना योद्ध्यांना एखादे फुल देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करावा. अशा  सामाजिक काम आपल्या हातून झाल्यास ते सोशल मीडियात शेअर करावे किंवा माझ्या अकाऊंटला टॅग करावे. तेच माझ्यासाठी सर्वात मोठे बर्थ डे गिफ्ट असेल, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.