सांगली : निवडणुकीमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. आज अजित पवारांनी तासगाव येथे संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर आबा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, 70 हजार कोटींच्या घोटाळ्यांच्या चौकशी फाईलवर आर आर पाटील यांनीच सह्या केल्या.
आर आर पाटील यांनी सह्या केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनीच मला दाखवलं, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्यांच्या या आरोपाला आता आबांचे सुपुत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव मतदारसंघाचे उमेदवार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले रोहित पाटील?
अजितदादा वयानं मोठे आहेत, एकेकाळी त्यांनी नेतृत्व केलं आहे, आम्ही देखील त्यांचं नेतृत्व स्वीकारत काम केलं आहे. आबांच्या पश्चात त्यांचं मार्गदर्शन होत असे. पक्षफुटीनंतर आदरणीय पवार साहेबांचं आबांच्या जडणघडणीतील योगदान लक्षात घेता आबा असते तर पवार साहेबांसोबत उभे राहिले असते. त्यामुळे आम्ही पवार साहेबांसोबत ताकदीनं उभे राहण्याची भूमिका घेतली.
आजचं दादांचं स्टेटमेंट मी ऐकलं. माझे वडील जाऊन नऊ-साडे नऊ वर्ष झालेली आहेत. नऊ साडे नऊ वर्षानंतर ही मळमळ बोलून दाखवली. माझ्या कुटुंबीयांना दु:ख झालं आहे. त्या काळी काय घडलं याची उत्तरं आबा गेल्यानंतर आम्ही देऊ शकत नाही. त्यावेळी काय घडामोडी असतील, काय घडलं असेल त्याची उत्तरं आबा हयात नसताना देऊ शकत नाही. आबा प्रामाणिकपणानं, स्वच्छपणानं काम करत होते.
गृहमंत्री असताना पारदर्शकपणे त्यांनी पोलीस भरती करुन घेतली. चांद्यापासून बांद्यापर्यंत चांगलं काम केल्याचा प्रत्यय लोकांना आहे. आबा गेल्यानंतर साडे नऊ वर्षांनी असा आरोप होत असेल तर दु:ख होत आहे. अजितदादा ज्येष्ठ आहेत, नऊ वर्षात त्यांच्या नेतृत्त्वात काम केलं आहे. आज त्यांच्या वक्तव्यानं कुटुंबीयांना दु:ख झालंय, सर्व कार्यकर्त्यांना दु:ख झालं आहे.
आबांनी गृहमंत्री म्हणून पारदर्शकपणे काम केलं याचं अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आज आबा असते तर उत्तर देऊ शकले असते. आबा बोलण्याच्या बाबतीत आणि उत्तर देण्याच्या बाबतीत पटाईत होते. अजित पवारांनी आठवण सांगितली असेल त्याच्याकडे टीका म्हणून बघत नाही, असंही रोहित पाटील म्हणाले.