मुंबई – रवीचंद्रन अश्विनची टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आता त्यामागचे खरे कारण समोर आले आहे. हिटमॅन रोहित शर्मा याने अश्विनच्या नावासाठी हट्ट धरला होता. कर्णधार विराट कोहलीनेही रोहितच्या निर्णयाला मान देत निवड समितीसमोर आपली मागणी ठेवली व तब्बल चार वर्षांनी अश्विनला मर्यादित सामन्यांच्या संघात स्थान मिळाले.
निवड समितीच्या या निर्णयामुळे सर्व भारतीय चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. अश्विनच्या भारतीय संघात प्रवेश करण्यामागे सर्वांत मोठा हात आहे तो भारतीय उपकर्णधार रोहित शर्माचा. अश्विनची आयपीएलमधील कामगिरी गेल्या काही काळापासून सातत्याने चांगली राहिलेली आहे. अश्विनने 2017 साली अखेरचा मर्यादित षटकांचा सामना खेळला. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला अश्विनच्या संघातील निवडीबद्दल विचारण्यात आले.
अश्विनचा अनुभव पाहता रोहितने टी-20 संघात परतण्याचा आग्रह धरला होता. अश्विनच्या निवडीबाबत रोहित आणि भारतीय कर्णधार विराट कोहली दोघांचेही समान मत होते. विराटला जेव्हा या ऑफस्पिनरचा संघात समावेश करण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यानेही या मुद्द्याचे समर्थन केले.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच भारतीय संघाचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे मालिकेबाहेर होता. या कारणास्तव निवडकर्त्यांनी सुंदरच्या जागी रवीचंद्रन अश्विनचा समावेश टी-20 विश्वचषक संघात ऑफस्पिनर म्हणून केला आहे.
काही काळ दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये खेळताना अश्विनची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या ऑफस्पिनरने आतापर्यंत खेळलेल्या 15 सामन्यांमध्ये 13 बळी घेतले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अश्विनने भारतासाठी एकूण 46 सामने खेळले असून, त्यात त्याने 52 बळी घेतले आहेत.