मुंबई – मागील काही दिवसांपासून गंभीर आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना आता दिलासा मिळाला आहे. मंत्रीपदावर गदा आल्यानंतर बदलेला घटनाक्रम मुंडे यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. त्यात आरोप करणाऱ्या महिलेनेच तक्रार मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यासाठी पक्षातील महिला नेत्या समोर येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. महिलांना देण्यात आलेल्या कायद्याच्या संरक्षणाचा कुठेही दुरुपयोग होऊ नये. एखादी महिला एखाद्या राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल करून त्याची प्रतिमा मलीन करत असेल तर संबंधीत नेत्याचं मोठ राजकीय नुकसान होतं. कधी कधी राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, त्याचं आयुष्य उध्वस्त होतं. त्यामुळे असे खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर राज्य सरकारने त्याची कसून चौकशी करावी. त्यानंतरच कारवाई करावी, जेणेकरुन महिलांसाठी दिलेल्या प्रोटेक्शन कायद्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही, अस रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.
पार्श्वगायनाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या आमिषाने, बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक-निर्मांत्याशी भेट घडवण्याच्या आमिषाने धनंजय मुंडे यांनी इच्छेविरुद्ध आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी केला होता. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने मुंडे यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.