BCCI – रॉजर बिन्नी हे १८ ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. यासोबतच सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा प्रवासही संपणार आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट विश्वात बीसीसीआय ( BCCI ) अध्यक्षपदाबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. यामध्ये देशाच्या राजकारणाचा समावेश असल्याचेही म्हटले जात होते. मात्र या सगळ्या घडामोडींवर आता सौरव गांगुली यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
गांगुली म्हणाले की, “मी माझ्या कारकिर्दीचा आनंद घेतला आहे, पण हे लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही खेळाडू म्हणून कायमचे खेळू शकत नाहीत किंवा कोणत्याही प्रशासकीय पदावर कायम राहू शकत नाहीत. मी पाच वर्षे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा अध्यक्ष होतो. मी पाच वर्षे बीसीसीआयचा ( BCCI ) अध्यक्ष होतो. शेवटी तुम्हाला पद सोडावे लागते. एक प्रशासक म्हणून तुम्हाला खूप योगदान द्यावे लागेल आणि संघासाठी गोष्टी अधिक चांगल्या कराव्या लागतील.”
बीसीसीआय ( BCCI ) अध्यक्षपदासाठी मंगळवारी सर्व संभाव्य उमेदवारांनी त्यांचे फॉर्म भरले होते. त्यानंतर रॉजर बिन्नी हे गांगुलींची जागा घेतील असा निर्णय घेण्यात आला. बिन्नी हे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेले आहेत. याशिवाय जय शहा हे बीसीसीआय ( BCCI ) सचिवपदी कायम राहणार आहेत. याव्यतिरिक्त सौरव गांगुली यांना आयपीएल अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार होती मात्र गांगुलींनी ती जबाबदारी घेण्यास नकार दिला. ( Roger Binny will replace Sourav Ganguly as new BCCI president )
कोण आहेत सौरव गांगुली यांची जागा घेणारे रॉजर बिन्नी?
सध्या कर्नाटक असोसिएशन ऑफ क्रिकेटचे अध्यक्ष असलेले रॉजर बिन्नी १८ ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे बीसीसीआय ( BCCI ) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. यापूर्वी बिन्नी हे बीसीसीआय ( BCCI ) निवड समितीचे सदस्य राहिले होते. त्याचबरोबर बिन्नी हे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे प्रमुख सदस्य होते. त्या विश्वचषकात त्यांनी १८ बळी मिळवले होते.