मुंबई – बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी (Roger Binny) यांचीच निवड होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली तसेच सचिव जय शहा अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे समोर आल्यावर बिन्नींचा या पदावर नियुक्त होण्याचा मार्ग खुला झाला असून येत्या 20 तारखेला याची अधिकृत घोषणाही होणार आहे.
सचिवपदावर जय शहाच कायम राहणार आहेत. बिन्नी हे सध्या कर्नाटक क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आहेत. तसेच ते बीसीसीआयच्या निवडसमितीचेही सदस्य होते.
बीसीसीआयमधील विविध पदांसाठी मंगळवारपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सहसचिव या पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. या पदांसाठी मंगळवारी तसेच आज (बुधवार) नामांकन होणार असून गुरुवारी अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर 18 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.