रोडरोमिओ मोकाट, पोलीस प्रशासन कोमात

– मुकुंद ढोबळे

शिरूर शहरात शाळा, कॉलेज सुरू होताच रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकी आणि रोडरोमियोंचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे शिरूर शहरातील शाळकरी मुली, महिलांबाबत सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यावर आवाज उठविणाऱ्या महिला संघटना गप्प का, असा प्रश्‍न शहरवासियांना पडला आहे. पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

पोलीस विभागाने रोडरोमिओंचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. शिरूर शहर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्‍याबरोबर इतर जिल्ह्यातील 25 हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. त्यात पाल्याना शाळेत सोडण्यासाठी महिला येतात. परंतु शाळा सुरू होताच अनेक रोडरोमिओंची भाऊगर्दी होत आहे. महिला- मुलींना पाहून टवाळकी करणे, गाणी म्हणणे, मोबाइल कानाला लाऊन जोरदार बोलणे, दुचाकी जवळून जोरात घेऊन जाणे आदी प्रकार सुरू आहेत. त्यामुळे महिला आणि मुली भयभीत होत आहेत. शाळा भरण्याच्यावेळी आणि मधल्या सुट्टीत, सुटण्याच्या वेळी हा धिंगाणा सुरू आहे. एका दुचाकीवर तीन ते चारजण बसलेले असतात. अनेक क्‍लासेसजवळ दुचाकीच्या चकरा सुरू असतात. रोडरोमिओंना पोलीसी खाक्‍या दाखवला तर लगाम बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.