चेन्नई – कोरोना या विषाणूने संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवला आहे. सर्वप्रथम चीनमध्ये आढळलेला हा विषाणू आता इटली, स्पेन, अमेरिका, इराण अशा अनेक देशांमध्ये पसरला असून त्याने येथील आरोग्य व्यवस्था अक्षरशः मेटाकुटीला आणली आहे. भारतामध्ये देखील कोरोनाचे संकट बळावताना दिसत असून त्याला वेळीच रोखण्यासाठी सरकारतर्फे युद्ध पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. इतर देशांचे अनुभव पाहता कोरोना संकटाचा सामना करायचा असल्यास आपल्याला आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यानं कोरोनाग्रस्तांवर उपाय करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. हा धोका टाळण्यासाठी आता चेन्नई येथील स्टॅन्ले शासकीय रुग्णालयात चक्क रोबोची मदत घेण्यात आली आहे.
याबाबतची माहिती एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिली असून स्टॅन्ले रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना व कोरोना संशयितांना अन्न व औषधं देण्यासाठी रोबोचा वापर केला जातोय. दरम्यान, रोबोचा वापर केल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांशी थेट संपर्क टाळता येणार असून यामुळं त्यांना या जीवघेण्या रोगाची लागण होण्याची शक्यता काही प्रमाणात का होईना पण कमी होणार आहे. या रुग्णालयामध्ये राबविण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असून अशाप्रकारे इतर रुग्णालयांमध्ये देखील याचा रोबोचा वापर करता आल्यास आरोग्य कर्मचारी कोरोनापासून स्वतःचा बचाव करून इतरांचे प्राण वाचवू शकतील यात शंका नाही.
Tamil Nadu: Robots have been deployed at Chennai’s Government Stanley Medical College and Hospital to serve food and medicines to #COVID19 positive or possibly infected persons. pic.twitter.com/c4hxxOI14r
— ANI (@ANI) April 3, 2020