नवी दिल्ली – बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांची आयकर विभागाने सलग दोन दिवस चौकशी केली होती. त्याशिवाय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडूनही त्यांची आधीच चौकशी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वढेरा यांनी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
देशाची सेवा करता करता शहीद झालेल्या कुटुंबातून मी आलोय. मी देशातील अनेक भागात राहिलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं दुष्प्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी संसदेत जाणं हे महत्त्वाचं आहे, असे त्यांनी म्हटल्याचे वृत्त काही इंग्रजी माध्यमांनी दिले आहे.
मी प्रदीर्घ काळ बाहेरची लढाई लढली आहे. परंतु, तरीही मला वारंवार त्रास दिला जात आहे. मी राजकारणात नसल्यानेच असं होत आहे, असं सांगतानाच आता राजकारणात प्रवेश करण्याचा मी योग्य वेळीच निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
लोकांनी मला स्वीकारलं पाहिजे. मला मतदान केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी मी काही करू शकेन, असा मतदारसंघ मी शोधणार आहे. विशेषत: माझ्या कुटुंबीयांनाही माझ्या राजकारण प्रवेशाचा निर्णय पचनी पडला पाहिजे, असेही ते म्हणाले.
2019मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं होतं. त्यानंतर कॉंग्रेस मुख्यालयाबाहेर होर्डिंग्ज लागले होते. त्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह रॉबर्ट वढेरा यांचेही फोटो होते.
लोकसभा निवडणुकीतही उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये त्यांचे पोस्टर लागले होते. त्यात त्यांना निवडणूक लढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याआधी 2016मध्ये लोकशाही बचाव मार्चच्या पोस्टरमध्येही वढेरा यांचा राहुल यांच्यासोबत फोटो दिसला होता. त्यामुळे वढेरा हे लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश घेण्याचे संकेत मिळत होते.
6 फेब्रुवारी 2012 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीत वढेरा आले होते. त्यावेळी त्यांनी लोकांची इच्छा असेल तर मी राजकारणात यायला तयार आहे, असं म्हटंल होतं. तेव्हा वढेरा यांचं विधान मीडियाने चुकीच्या पद्धतीने दाखवल्याची सारवासारव प्रियांका गांधी यांनी केली होती. त्यानंतर वढेरा यांनीही सारवासारव करताना मी उद्योग व्यवसायातच बरा असं सांगत राजकारणात येणार नसल्याचं म्हटलं होतं.