इंधन दरवाढीचा निषेध! राॅबर्ट वाड्रांनी थेट सायकलीवरून गाठलं ऑफिस; म्हणाले…

नवी दिल्ली – देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. संपूर्ण देशभरात दरवाढीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. आज सोमवारी व्यावसायिक आणि प्रियांका गांधी यांचे पती राॅबर्ट वाड्रा यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आपली एसी गाडी सोडून चक्क सायकलवरून ऑफिस गाठलं आहे.

दिल्लीतल्या खान मार्केटपासून आपल्या कार्यालयापर्यंत ते सायकल चालवत पोहचले. या दरम्यान त्यांचा स्टाफही त्यांच्यासोबत होता. यावेळी वाड्रा यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवरून मोदी सरकारवर निशाणाही साधला. ‘सामान्य जनता कशी हैराण झालीय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या एसी गाडीतून बाहेर निघून पाहायला हवं. हे चित्र पाहून तरी ते पेट्रोल डिझेल्या किंमती कमी करतील,’ असं वाड्रा यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या प्रत्येक अपयशाचे खापर आधीच्या सरकारवर फोडत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय. सामान्य व्यक्ती आज मोठ्या संकटात आहे. त्यांचे दु:ख आज मला जाणवतंय. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने आज लोक रस्त्यावर आलेत, असेही राॅबर्ट वाड्रा यांनी म्हटलंय.

दरम्यान, आज सोमवारी तेल विपणन कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेल्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दिल्लीत आज पेट्रोलचे दर 90.58 रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 80.97 रूपये प्रतिलिटर आहेत. देशातील अनेक भागांत पेट्रोलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.