रॉबर्ट वढेरा यांना देश सोडून जाण्यास मनाई; अटकपूर्व जामीन मंजूर

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेव्हणे रॉबर्ट वढेरा यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी देशाबाहेर न जाण्याची सूचना केली. वढेरा यांच्याविरोधात सुरू असलेल्या मनी लॉंडरिंग प्रकरणाशी संबंधित पुराव्यांशी छेडाछेड आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्नही करू नये, तसेच तपास संस्थांकडून सांगण्यात येईल तेंव्हा तपासकामात सहकार्य करण्याची सूचना ही न्यायालयाने वढेरा यांना केली आहे. न्यायालयाने वढेरा यांना या सर्व अटींच्या आधारे अटकपूर्व जामीन मंजूर केला.

वढेरा यांना चौकशीसाठी कोठडी देण्यात यावी. त्यासाठी अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी “ईडी’चे विशेष सरकारी वकिल डी.पी.सिंह आणि नितेश राणा यांनी केली होती.

वढेरा यांच्यावर लंडनमधील 12 ब्रेन्स्टन स्क्‍वेअरमधील 1.9 दशलक्ष पौंड किंमतीची मालमत्ता खरेदी प्रकरणी मनी लॉंडरिंगचे आरोप आहेत. वढेरा यांनी आतापर्यंत तपासास सहकार्य केले आहे आणि त्यांच्याविरोधात पुराव्यांशी छेडाछेडीचा किंवा साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याचा आरोपही नाही. हे प्रकरण प्रामुख्याने “ईडी’कडील कागदोपत्री पुराव्यांवर आधारलेले आहे, असे त्यांचे वकिल ऍड. आशुतोष मनु सिंघवी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. वढेरा यांच्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली असून सुमारे 20 हजार पानी दस्ताऐवज जप्त केले गेले आहेत. वढेरा 6 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान 9 वेळा चौकशीसाठी हजर झाले असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले गेले. त्यामुळे विशेष न्यायालयाने 5 लाख रुपयांच्या वैयक्तिक जामिनाबरोबर एका हमीदाराच्या लेखी हमीवर वढेरा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.