नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेव्हणे रॉबर्ट वढेरा यांची आज पुन्हा ईडी मार्फत चौकशी करण्यात आली. इंडिया गेट जवळील ईडीच्या ऑफिसमध्ये त्यासाठी ते पावणे अकरा वाजता उपस्थित राहिले. त्यांची गेल्या गुरूवारीच या प्रकरणी तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली होती.
आज पुन्हा ते ईडीसमोर उपस्थित राहिले. त्या संबंधात सोशल मिडीयावर वढेरा यांनी एक संदेश प्रसारीत केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की आपली आता तेरा वेळा चौकशी झाली असून तब्बल 80 तास आपल्याला वेळोवेळी विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना आपल्याकडून उत्तर दिले जात असून सुद्धा या चौकशीच्या प्रकरणात सनसनाटीपणा आणला जात असून अनावश्यक ड्रामाही केला जात आहेत. पण तरीही आपण शांत आणि ठाम राहिलो आहोत असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.
आपले आयुष्य हे एक वेगळ्याच प्रकारचे आयुष्य बनले आहे. गेली दहा वर्षे आपण निराधार आरोपांशी झुंजत आहोत. एखाद्याची वस्तुस्थिती बदलू शकते पण त्याचे जे प्रामाणिक मन असते ते बदलू शकत नाही. मी सत्यावर ठाम आहे. त्यावर मी आता एक पुस्तकच लिहीण्याच्या इराद्यात आहे. त्यातून जगाला सर्व स्थिती समजू शकेल. माझी बाजू लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न अशा पुस्तकातून करावा असे आपल्याला वाटू लागले आहे असे त्यांनी म्हटले आहे.
रॉबर्ट वढेरा यांनी लंडन येथे एक मालमत्ता विकत घेतली असून ती मालमत्ता त्यांनी आपल्या उत्पन्नात दाखवली नाही असा त्यांच्यावर जो आरोप आहे त्याबाबत त्यांची ईडीने अकरावेळा चौकशी केली असून राजस्थानातील बिकानेर येथील जमीनीच्या प्रकरणात त्यांची दोन वेळा चौकशी झाली आहे.