माधव विद्वांस
वाफेवर चालणारी पहिली व्यावसायिक बोट तसेच लढाऊ पाणबुडी तयार करणारे रॉबर्ट फुल्टन यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1765 रोजी अमेरिकेतील पेनिसिल्व्हानियातील लिटील ब्रिटनमध्ये झाला. सहाव्या वर्षांपासून ते फिलाडेल्फियामध्ये राहिले. तेथे लहानपणापासूनच त्यांनी पोर्ट्रेट, लॅंडस्केप आणि यंत्रसामग्रीची संकल्पचित्रे काढली आणि अर्थार्जन सुरू केले. 1785 मध्ये फुल्टनने पिट्सबर्गजवळील वॉशिंग्टन काउंटीमधील होपवेल टाउनशिप येथे एक फार्म विकत घेतले व कुटुंबीयांसह तेथे राहायला गेले.
वयाच्या 23 व्या वर्षी ते युरोपमध्ये गेले. तेथे ते 20 वर्षे राहिले. या कालावधीत त्यांनी पोर्ट्रेट आणि लॅंडस्केप्सची अनेक कामे मिळविली. त्याचवेळी त्यांचा बोटयंत्र अभ्यास सुरूच होता. लॅंकेस्टरचे राज्य प्रतिनिधी विल्यम हेन्री यांची त्यांनी गाठ घेतली. कारण ते इंग्लंडला असताना जेम्स वॅट आणि त्याचे स्टीम इंजिन याबद्दल शिकले होते. यंत्रयुग सुरू झाल्यावर वाफ, डिझेल, पेट्रोल, वीज आणि अणुशक्ती असे इंधन म्हणून पर्याय बदलत गेले. पुरातनकाळापासून मालवाहतुकीसाठी व प्रवासीवाहतुकीसाठी जलमार्ग हा अतिशय किफायतशीर होता; पण त्यासाठी बराच कालावधी व वाऱ्यावर अवलंबून राहावे लागत असे.
1807 मध्ये फुल्टन यांनी वाफेच्या इंजिनाचा बोटींसाठी वापर सुरू केला. 1793च्या सुमारास, फुल्टन यांनी अमेरिका आणि ब्रिटिश सरकारांना स्टीमवर चालणाऱ्या जहाजांच्या योजना प्रस्तावित केल्या. फुल्टन यांना व्यावसायिक स्टीमबोट विकसित करण्याचे श्रेय दिले जाते. पहिल्यांदा 62 तासांमध्ये 300 मैल स्टीमबोटने प्रवाशांसह हडसन नदीवर न्यूयॉर्क शहर ते अल्बानीपर्यंत प्रवास केला आणि अमेरिकेतील जलवाहतुकीमध्ये क्रांती केली. दरम्यानच्या काळात नेपोलियन बोनापार्ट याने फुल्टन यांच्याकडे पाणबुडी तयार करण्याचे काम सोपविले.
ब्रिटिश रॉयल नेव्हीद्वारे वापरल्या जाणाऱ्या जगातील काही प्रारंभीच्या नेव्ही टॉर्पेडोचा शोध लावण्याचे श्रेयही फुल्टन यांना जाते. इंग्लंडमध्ये फुल्टनने ड्यूक ऑफ ब्रिजवॉटरला भेट दिली. तेथे नवीन बोटींच्या चाचणीसाठी कालवा बांधला होता. त्यावर फुल्टन यांनी पुस्तकही लिहिले. त्यांनी 1796 ते 1799 या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये बेंजामिन पॉवेल यांच्या देखरेखीखाली एक बोट बांधली.
1797 मध्ये फुल्टन पॅरिसला गेले. त्यांनी गणित आणि रसायनशास्त्रासह फ्रेंच आणि जर्मन भाषेचे शिक्षण घेतले. त्यांनी पॅरिसमध्ये दर्शविल्या जाणाऱ्या पहिल्या पॅनोरामा चित्रकलेचे प्रदर्शनही केले. फ्रान्समध्ये वास्तव्य करीत असताना फुल्टन यांनी 1793 ते 1797 च्या दरम्यान प्रथम पाणबुडी, नॉटिलसची रचना केली. पाणबुडी व वाफेवर चालणाऱ्या बोटीमुळे जगाचे जलपरिवहन व जलयुद्धतंत्रातही मोठा बदल झाला.