पुणे – ज्येष्ठ महिलेला मोफत औषध देण्याचा बहाणा करत आडबाजूला नेऊन लूटण्यात आले. ही घटना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रास्तेवाडा येथे रहात असलेली एक 70 वर्षीय महिला, औषध आणण्यासाठी मेडिकलमध्ये चालली होती. यावेळी दोन व्यक्ती तीच्या जवळ आल्या. यापैकी एकाने आमच्या शेठला मुलगा झाला आहे, ते फुकट औषध वाटत आहेत, माझ्या सोबत चला असा बहाणा केला. यानंतर त्यांना मन मंदिर दुकानाचे जवळ नेऊन तेथे दुसऱ्या साथीदाराने पाणी पाजले.
तेथून त्यांची दिशाभूल करत रास्ता पेठेतील जैन मंदिराच्या आत वडाच्या झाडाखाली ओट्यावर बसवले. तेथे पहिल्या भेटलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्या तोंडाला रुमाल लावला. तर दुसऱ्या आरोपीने त्यांच्या दोन्ही हातातील सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने काढून घेत पळ काढला. या बांगड्यांची किंमत जवळपास एक लाख रुपये इतकी होती. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते करत आहेत.