पुणे – रिक्षा चालकाने साथीदाराच्या मदतीने एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवत लूटले. ही घटना स्वारगेट ते पर्वती प्रवासा दरम्यान घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी तीघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सद्दाम मुस्तफा बिद्री ( 27 , रा. इंदिरानगर खड्डा गुलटेकडी),समीर मुस्तफा शेख ( 26 रा. पर्वती दर्शन ) यांना प्रथम ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी साथीदार समीर बागवान याचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याप्रमाणे समीर बाबूलाल बागवान ( 37 रा. पर्वती दर्शन ) यालाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून चोरलेला मोबाईल, रोख दोन हजार, चाकू आणी रिक्षा असा माल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मिळालेल्या खबरीनूसार आरोपींना जेरबंद करण्यात आले.
फिर्यादी संतोष सुभाष बंडगर(रा.संतोषनगर, कात्रज) हा 20 सप्टेंबर रोजी स्वारगेट एसटी स्टॅंडच्या आऊटगेटजवळ कात्रजला जाण्यासाठी रिक्षात बसला होता. यावेळी रिक्षात अगोदरच दोघे बसले होते. कात्रजला जात असताना रिक्षा चालकाने रिक्षा राजमाता हॉस्पिटलच्या बोळात घातली. यानंतर रिक्षात पाठिमागे बसलेल्या प्रवाशाने संतोषचा हात पकडून ठेवला. तर रिक्षा चालकाने पोटास चाकू लावून धमकावले. तीसऱ्या व्यक्तीने त्याच्या खिशातील रोख दोन हजार आणी 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्ती काढून घेतला. यानंतर त्याला रस्त्यात सोडून देण्यात आले.
संतोष हा मुळचा सांगोला येथील असून तो पुण्यात एसी रिपेअरींगची कामे करतो. गणेशोत्सवात दरम्यान तो गावाला गेला होता. घटनेच्या दिवशी तो सांगोल्यावरुन पुण्यात आला, स्वारगेट येथे उतरताच आरोपींनी त्याला शेअर रिक्षा असून 30 रुपयांत कात्रजला नेतो असे सांगितले होते.
उत्सव हॉर्टेलच चौकात आल्यावर रिक्षा एका बोळात नेऊन त्याला लूटण्यात आले. घटनेमुळे तो भांबावला होता. तो त्याच्या मित्रांसोबत एका भाड्याच्या खोलीत रहातो. त्याने ही घटना काही दिवस मित्रांनाही सांगितली नव्हती. मित्रांनी मोबाईलबद्दल विचारणा केल्यावर त्याने घटना सांगितली. मित्राच्या सल्लयाने तक्रार दिल्यावर पोलिसांनी रिक्षाच्या हुडच्या रंगावरुन तीघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे , सहायक पोलीस आयुक्त बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जायभाय, पोलीस हवालदार ,सज्जाद शेख, पोलीस नाईक विजय खोमने, पोलीस शिपाई सचिन दळवी, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, शंकर गायकवाड यांच्या पथकाने केली