वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

पिंपरी – वाहनाची तोडफोड करीत एका तरुणांच्या खिशातील पैसे जबरदस्तीने लुटून नेणाऱ्या पाच जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे रविवारी (दि. 15) घडली. डॅनिअल चांदणे (वय 19), लाल्या ऊर्फ रोहन गोटे (वय 19), यश सुनील पाटोळे (वय 20, तिघेही रा. जुनी सांगवी), जोग्या ऊर्फ अक्षय जाधव, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींनी नावे आहेत. विनोद रतन गायकवाड (वय 31, रा. गांगुर्डेनगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास फिर्यादी गायकवाड हे आपल्या घराजवळ बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी तू येथे का बसला आहे. तू योग्या जगतापच्या जिवावर उड्या मारतोस का, असे म्हणत गायकवाड यांच्या कानाखाली चापट मारत त्यांच्या खिशातील बाराशे रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले. तसेच जाताना दहशत निर्माण करण्यासाठी परिसरातील वाहनांची कोयता व सिमेंटचा गट्टू मारून तोडफोड केली. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.