पाटणा : बिहारमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांद्याचे भाव प्रति किलो 100 रुपये दराने होत आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे दरोडेखोरांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. बिहारमध्ये कांदा आणि लसूण लुटल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील मोहनिया पोलिस स्टेशन अंतर्गत दरोडेखोरांनी ट्रकला चालकाला ओलिस ठेवून कांद्याने भरलेले 102 पोटे लुटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इलाहाबाद वरून प्रयागराज जहानाबाद येथे 51 क्विंटल कांद्याने भरलेला ट्रक जात होता. त्यावेळी सहा दरोडेखोरांनी ट्रकचालकास बंदी बनून ट्रकमधील 102 पोटे लुटले. ट्रकचालकाचे नाव देशराज असून ते उत्तर प्रदेशातील कौशंबी जिल्ह्याचे रहिवाशी आहे.
मोहनिया पोलिस स्टेशनमध्ये चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कैमूर जिल्ह्यातील कुदरा पोलिस स्टेशन अंतर्गत दरोडेखोरांनी गाडीमधून एक क्विंटल 20 किलो लसूण लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी कुदरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु अद्यापपर्यंत पोलिसांना या प्रकरणात यश आलेले नाही.