मुद्दाम केले जातात पंक्चर : वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा पंक्चर व्यावसायिकांकडून वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. वाहने मुद्दाम पंक्चर करणे, पंक्चर काढण्यास गेल्यावर ट्यूबच बदलणे आणि टायरला पॅच मारणे हे प्रकार सर्रास सुरु आहेत. काही वर्षांपूर्वी असे प्रकार वाढल्यानंतर पंक्चरवाल्यांच्या संघटनेने स्वत: हस्तक्षेप करत ग्राहकांना लुटणाऱ्या पंक्चर दुकानदारांवर कारवाई सुरु केली होती.
रहाटणी, वाकड-भूमकर चौक, दापोडी-फुगेवाडी या भागांमध्ये पंक्चर व्यावसायिकांकडून आलेले अनुभव नागरिकांनी “दै. प्रभात’ला सांगितले. रहाटणी येथील शेल पेट्रोल पंपाजवळ अभय वाणी हे पंक्चरच्या दुकानाजवळ कारमधील हवा तपासण्यासाठी थांबले होते.
तेथील कामगाराने त्यांना गाडीच्या टायरमध्ये पंक्चर असल्याचे सांगितले. त्यांनी त्याला पंक्चर काढण्यास सांगितले. त्यानंतर गाडीमध्ये आणखी एक पंक्चर असल्याचे त्याने सांगितले. वाणी हे फोनवर बोलत होते. त्यांनी त्याला दुसरे पंक्चर देखील काढण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर आणखी एक पंक्चर असल्याचे सांगितल्यानंतर वाणी सावध झाले. पुढील पंक्चर काढून घेण्यासाठी तो कामगार आग्रह करीत होता.
त्यांनी त्याला पुढील पंक्चर काढू नको, असे सांगितले. त्यांना दोन पंक्चरसाठी 160 रुपये मोजावे लागले. वाणी म्हणाले, मी त्यानंतर दोनदा मुंबईला जाऊन आलो. गाडी व्यवस्थित आहे.
भूमकर चौकात कमी होते हवा
वाकड येथील भूमकर चौकात दोनदा माझ्या कारची हवा अचानक कमी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर मात्र मी त्या रस्त्याने जाणे बंद केल्याचे तेजस्विनी डोमसे-सवाई यांनी सांगितले. भूमकर चौक ते डांगे चौक या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना एखादे-दुसरे पंक्चर असताना पाच ते सहा पंक्चर सांगून तेथेही लूट सुरू असल्याची माहिती काही वाहनचालकांनी दिली. दुचाकीसाठी प्रति पंक्चर 50 ते 60 रुपये, ट्युबलेस टायरच्या पंक्चरसाठी 80 रुपये आकारले जातात. कारसाठी प्रति पंक्चर 60 ते 70 रुपये, ट्युबलेस टायरसाठी प्रति पंक्चर 100 रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाते. मात्र, पाच ते सहा पंक्चर काढल्यानंतर नागरिकांच्या खिशाला त्याची चांगलीच आर्थिक झळ बसत आहे.
दापोडी-फुगेवाडीत वेगळाच खेळ
गाडीत हवा कमी असल्याचे सांगून दापोडी-फुगेवाडी भागात फसवणूक केली जात असल्याचे गणेश बोरा यांनी सांगितले. बोरा म्हणाले, दापोडी पोलीस चौकीजवळ सीएनजी पेट्रोल पंपाजवळ चाकात हवा कमी आहे, असे एका दुचाकीवरील तरुणाने मला सांगितले. मी त्याला पंक्चरचे दुकान कोठे आहे, असे विचारल्यावर थोड्या अंतरावरच असल्याचे सांगितले. त्यानंतर याबाबत संशय आल्याने मी त्याचा पाठलाग केल्यानंतर तो तेथून पसार झाला. वाहनात हवा कमी असल्याचे सांगून त्यानंतर वाहनांचे जादा पंक्चर करून वाहनचालकांची लूट केली जात आहे.