११ संगणकासह अडीच लाखाचे शालेय साहित्य पळविले
नीरा – ग्रामीण भागातील शाळांमधील संगणक व ई-लर्निंग संच चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. नीरा नजिक थोपटेवाडी येथील असेंड इंटरनॅशनल स्कूल मधील संगणक, प्रिंटर, ई लर्निंग संच अशा सुमारे दोन लाख रूपये किमतीची वास्तुंची रात्री चोरी झाली आहे.
पुरंदर तालुक्यात यावर्षीच्या सुरुवातीपासूनच प्राथमिक व माध्यमिक शाळांतील संगणक चोरणाऱ्या टोळ्यांनी उच्छाद मांडला होता. तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व खासगी शाळांमधून या चोरट्यांनी अनेक संगणक चोरून नेले आहेत. मध्यंतरीच्या काळात पोलिसांनी कारवाई करीत अनेक संशयितांची धरपकड केली या कारवाईच्या बडग्यामुळे अशा चोरीच्या घटना थांबल्या होत्या. मात्र, रविवारी (दि.1) रात्री नीरा नजीक (ता. पुरंदर) थोपटेवाडी येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील संगणक चोरट्यांनी पुन्हा एकदा पळवले.
मध्यरात्री कुलूप तोडून 11 संगणक, प्रिंटर, सिसिटीव्ही कॅमऱ्याचा डिव्हीआर या वस्तूंचा यात समावेश आहे. हे एकुण अडीच लाखाचे साहित्य चोरीला गेल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. घटना स्थळी पोलीसांनी पाहणी करीत पंचनामा केला असला तरी चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
डिजिटल शाळांची सुरक्षा धोक्यात…
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शासनाच्यावतीने तसेच काही दानशुर व्यक्ती व संस्थांनी संगणक व ईर्नींग संच देऊन डिजिटल शाळा बनविल्या आहेत. चोरट्यांनी याच संचावर डोळा ठेवत चोरीचे सपाटा लावला आहे. त्यामुळे मोठ्या कष्टाने उभारलेल्या डिजिटल शाळांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
शाळांत चोऱ्या होऊ नयेत याकरीता ग्रामस्थांच्या बैठका घेऊन ग्रामरक्षक दल रात्री तैनात करून प्रभावी रात्रगस्त करण्याबाबत सुचना प्रत्येक गावातील पोलीस पाटलांना केल्या आहेत. ग्रामपंचायत व ग्रामसुरक्षा दल ग्रामस्थ यांच्या समन्वयातून योग्य त्या खबरदारीच्या उपाय योजना करण्याच्याही सुचना केलेल्या आहेत. परिसरात पोलीस पेट्रोलिंगही सुरू आहे.
– अंकुश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जेजुरी