शिक्रापुरात दुकाने फोडण्याचा सपाटा सुरूच

दिवाळीच्या तोंडावर व्यापारी भयभीत; पोलीसांकडून तपासात कुचराई

शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमधील अनेक गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना असंख्य चोऱ्यांचा तपास लागला नाही. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी पोलीस स्टेशनसमोरील ग्रामपंचायतच्या गाळ्यातील एका दुकानात चोरी केली होती. आता चक्‍क नव्याने सुरू झालेल्या कपड्याच्या दुकानातील सर्वच कपडे व इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेत दुकान पूर्णपणे मोकळे केले.

त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यापारी भयभीत झाले आहेत. याबाबत महादेव नागनाथ सोळंके (रा. सोळंके वस्ती, कोलवडी, ता. हवेली) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर येथील एसटी स्थानकाशेजारी दीड महिन्यांपूर्वीच महादेव सोळंके, नागनाथ सोळंके व माणिक सूर्यवंशी यांनी नवीन कपड्याचे दुकान सुरू केले होते. दिवाळीमुळे नवीन कपड्याचा माल दुकानामध्ये आणला होता, शुक्रवारी रात्री सोळंके व त्यांचे साथीदार दुकान बंद करून गेले. त्यांनतर रात्री चारच्या सुमारास एका बॅंकेच्या सुरक्षा रक्षकास दुकानाचे शटर उचकटल्याचे निदर्शनास आले.

यावेळी सुरक्षारक्षकाने स्थानिकांना माहिती दिली. गाळ्याचे मालक बाळासाहेब मांढरे यांनी महादेव सोळंके यांना फोन करून माहिती दिली, त्यांनतर सोळंके हे दुकानात येऊन पाहणी केली. त्यांना दुकानातील सर्वच कपडे व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.

चारचाकी गाडीतून मुद्देमाल पळविला
शिक्रापूर येथे ज्या ठिकाणी दुकानात चोरी झाली. त्याजवळ एका टेम्पोमध्ये झोपलेल्या इसमाने हा प्रकार पहिला. त्यावेळी त्याने नियंत्रण नियंत्रण कक्षाला फोन केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस स्टेशन येथे फोन लागला नाही. त्यानंतर चारचाकी गाडीतून आलेले चोरटे तळेगाव रोडकडे गेले. पुन्हा चाकण चौकातून गेले, हा प्रकार पाहणाऱ्या व्यक्तीने चाकण चौकात धाव घेतली असता त्याला तेथे पोलीस दिसले नाही. तोपर्यंत सर्व चोरटे पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी टेम्पो चालकाने सांगितले आहे.

1 Comment
  1. Anil memane says

    Shikrapurche police complaint pan registered karat nahit. Police station cha kahi upyog ahe ka?. Mazya ghari gharfodi zali hoti. Application ghetle pan FIR nahi process keli.

Leave A Reply

Your email address will not be published.