मुंबई – गेल्या काही दिवसांत दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नालासोपारा परिसरातील साक्षी ज्वेलर्सवर दरोडा घालून दरोडेखोरांनी सराफाची चाकून भोकसून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (दि.21) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
किशोर जैन यांचे नालासोपारा पाश्चिमेच्या रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एसटी डेपो रोड वर साक्षी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे जैन दुकानात आले. पूजा सुरु असताना दोन इसम दुकानात शिरले. त्यांनी जैन यांच्याकडे लाॅकरची चावी मागितली. मात्र, जैन यांनी चावी देण्यास नकार दिला. यामुळे हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार करून जखमी केले. लाॅकर उघडता न आल्याने इतर दागिने घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला. जखमी जैन यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून पुढील कारवाई सुरु असल्याचे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.