मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. घरात दरोडा टाकून चोरट्यांनी दागिन्यांसह सुमारे 1.41 कोटी रुपयांची चोरी केली आहे. अभिनेत्रीने याप्रकरणी तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चोरी झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तुघलक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हे प्रकरण अत्यंत हायप्रोफाईल असल्याने नवी दिल्ली जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत अनेक पथके तयार केली आहेत. अभिनेत्रीच्या घरात 25 नोकरांशिवाय 9 केअर टेकर, ड्रायव्हर आणि माळी आणि इतर कर्मचारीही काम करतात. पोलीस सर्वांची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, सोनमचे सासरे, 22 अमृता शेरगिल मार्ग येथे राहतात. येथे त्यांच्या आजी सासू सरला आहुजा (86), मुलगा हरीश आहुजा आणि सून प्रिया आहुजा यांच्यासोबत राहतात. सरला आहुजा यांनी व्यवस्थापक रितेश गौरासोबत 23 फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलीस स्टेशन गाठले आणि त्यांच्या खोलीतील कपाटामधून दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार केली. 11 फेब्रुवारी रोजी कपाट तपासले असता दागिने व रोख रक्कम गायब होती. सरला आहुजा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी दोन वर्षांपूर्वी दागिने तपासून कपाटात ठेवले होते. पुढील तपास तुघलक रोड पोलीस करत आहेत.