पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या घरावर दरोडा

सव्वातीन लाखाचा ऐवज लुटून शेतकऱ्याच्या पत्नीला केले गंभीर जखमी

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील लक्ष्मण जोरवर हे शेतकरी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरावर दरोडा टाकून घरातील सव्वातीन लाखाचा ऐवज लुटून लक्ष्मण जोरावर यांच्या पत्नीवर हल्ला करुन त्यांना गंभिर जखमी केल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या बाबात पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि. तालुक्यातील ओगदी या गावातील शेतकरी लक्ष्मण जोरवर याची गावापासून काही अंतरावर त्यांची वस्ती आहे. दिवसभर योग्य दाबाने विजपुरवठा होत नसल्याने उभ्या पिकांचे नुकसान होवू नये म्हणून शुक्रवारी रात्री १ वाजताच्या सुमारास शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी ते गेले असता पावने दोनच्या दरम्यान दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्या घराचे दार दगडी पाट्याने तोडून घरात प्रवेश केला. घरात झोपलेल्या कमलबाई लक्ष्मण जोरवर (वय. ४५) यांना लाकडी दांडक्याने जबर मारहान करुन त्यांना गंभिर जखमी करत दहशत निर्माण केली आणि घरातील सामानाची उचकापाचक करीत घरात ठेवलेले रोख ५० हजार रूपये व ६ तोळे सोने असा ३ लाख १८ हजाराचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले.

दरोडेखोरांच्या हल्ल्याने जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कमलबाई जोरवर यांनी स्वतःला सावरत आरडा ओरड करुन शेजाऱ्यांना बोलावले मात्र दरोडेखोरांनी शेजारच्या घरांना बाहेरुन कड्या लावल्या होत्या. अखेर एकतास उशिरा शेजारचे नागरीक जोरवर यांच्या घरी आले असता. कमलबाई गंभीर जखमी अवस्थेत दिसल्या. रविंद्र पोळ,विष्णुपंत कोल्हे यांनी कमलबाई यांची अवस्था पाहुन विवेक कोल्हे यांना रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान फोन करुन रुग्णवाहीका पाठविण्यास सांगितले.

विवेक कोल्हे यांनी त्वरीत रुग्ण वाहीका पाठवून जखमी कमलबाई यांना कोपरगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. वेळेत उपचार सुरू झाल्याने जखमी कमलबाई यांची प्रकृती सध्या स्थिर असुन त्यांच्या हातला मोठी दुखापत झाल्याने त्यांच्यावर कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहे.

दरम्यान या घटनेची माहीती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना समजताच ते आपल्या फोजफाट्यासह रात्री घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून पोलीस निरीक्षक जाधव यांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी दोन पोलीस पथके रवाना केली तर जखमी कमलबाई यांचा रुग्णालयात जावून जबाब नोंदवून अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

या घटनेची माहीती परिसरात कळताच नागरीकामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदन चोराची टोळी, दरोडेखोरांच्या टोळ्या,वाहने चोरांचा सुळसुळात,मोटारसायकलवरुन मंगळसुत्र चोरांचा वाढता वावर यामुळे तालुक्यातील नागरीक त्रस्त झाले आहेत. तालुक्यात पोलीसांपेक्षा चोरांची दहशत वाढत आहे तेव्हा पोलीस प्रशासनाने याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागनी ग्रामस्थांतून होत आहे.

कोपरगाव शहरासह तालुक्यात चोरांनी धुमाकुळ घातला आहे. सर्वसामान्य नागरी ,शेतकरी ते थेट लोकप्रतिनिधींच्या घरावर चोरांनी दरोडा टाकण्याचे धाडस करीत असल्याने तालुका किती असुरक्षित होतोय हे अशा घटनावरुन सिद्ध होत आहे.

शेतकरी सर्व बाजूने संकटात:
विजवितरण विभाग योग्य दाबाने दिवसा विजपुरवठा करण्या ऐवजी रात्री करते त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना जगवण्यासाठी रात्रभर जीव धोक्यात घालुन शेताला पाणी द्यावे लागते. थंडीवाऱ्यात अनेक श्वापदांचा सामना करुन शेती करावी लागते. रात्री शेतकरी घरी नसल्याचा फायदा दरोडेखोर घेवून त्यांच्या घरावर दरोडा टाकुण जीवघेणा हल्ला करतात. कष्टमय जीवन जगणाऱ्या या जगाच्या पोशिंद्याला कोणतेही संरक्षण नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.