अभिनय क्षेत्राला गवसणी घालणारी:रोहिणी हट्टंगडी !

2010 साली महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. साऱ्या वर्षात सरकारकडून दरवर्षी भरणारं नाट्यसंमेलन भरण्याचे काही लक्षण दिसेना. मग पुण्यातल्या सर्वश्री सुनील महाजन, प्रकाश पायगुडे, प्रकाश यादव, योगेश सोमण आणि सातारहून पुण्यात स्थायिक होण्यासाठी आलेले शिरीष चिटणीस अशा पाच नाट्यवेड्या मंडळींनी पुण्यात दोन दिवसांचं नाट्यसंमेलन भरवण्याचे ठरवलं. मला त्यांनी तुम्हीच या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद भूषवा अशी गळ घातली. मी नाही म्हणायचे काही कारण नव्हतं. मग मीही त्यांच्या त्या कामात सामील झालो. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील त्यावेळी सिक्‍कीम-बिहारचे राज्यपाल होते. त्यांना निमंत्रण द्यायचे ठरलं. शिवाजी महाराजांच्या तेराव्या पिढीचे वंशज सातारचे उदयनराजे भोसले यांना निमंत्रण दिले गेले. उद्‌घाटन कुणाच्या हस्ते करावे असा विचार सुरू असताना अचानकपणे माझ्या तोंडून आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी हिचे नाव पुढे आले. पण मनात आलं ती आता एवढी मोठी नाट्य-चित्रपट-मालिका अभिनेत्री झालेली आहे, ती आपल्याला ओळखेल का आणि या नाट्यसंमेलनाच्या उद्‌घाटनासाठी येईल का?

एक दिवस विचार करण्यात गेला. दूरध्वनी ठाऊक होता. उचलला. बोललो. विचारलं ती “उद्या सांगते’ म्हणाली आणि काय आश्‍चर्य दुसऱ्या दिवशी रोहिणीचाच आपण होऊन दूरध्वनी आला. “येते. नक्‍की येते’ म्हणाली. मला खूप बरं वाटलं. आमच्या साऱ्या टीमलाही बरं वाटलं. मला बरं वाटलं ते यासाठी की, आपण अजून तिच्या स्मरणात आहोत. ती आपल्याला विसरलेली नाही. रोहिणीचे आई-वडील माझ्या चांगल्या परिचयाचे. त्यात तिचे वडील आणि मी “प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’मध्ये काम करत होतो. “सत्तावनचे सेनानी’ या नाटकात आम्ही सहकलाकार होतो. तेव्हापासून आणि रोहिणी 10-12 वर्षांची होती तेव्हापासून मी तिला ओळखत होतो. पण तरीही नाव झाल्यावर माणसं कशी वागतील याबद्दल निश्‍चित काही सांगता येत नाही. रोहिणीनं मला सुखद धक्‍का दिला. ती त्या संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी तर आलीच पण तिच्या अत्यंत सुसंस्कृत वागण्याने आणि निगर्वी स्वभावाने तिने साऱ्या प्रेक्षकांची मने एका क्षणात जिंकली. सर्वांना तिचे ते विनम्र वागणं मोहवणारं होतं.

मग मला आठवण झाली ती 1970 च्या आसपास रोहिणी आणि तिचा त्या काळातला मित्र आणि नंतर तिचा नवरा झालेल्या जयदेव हट्टंगडी यांची आमच्या दिल्लीतल्या देवनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागामधल्या “दिवाणभवन’ या वास्तुतल्या त्यांच्या भेटीची. दोघंही नाट्यगुरू म्हणून ओळखले गेलेले. इब्राहिम अलकाझी यांच्याच नाट्यशाळेत “नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिकत होते. अनंतराव ओकांच्या सांगण्यावरून ती मला भेटायला आली होती. तशी ती आणि जयदेवही दिल्लीत नवीन होते. अजून रुळायचे होते. दोघांनी एनएसडीमध्ये प्रवेश घेतलेला होता. तसं रोहिणी वा जयदेव यांचं माझ्याकडे काम असं काहीच नव्हतं. पण एक वडीलधारी माणूस म्हणून ती दोघं अनंतरावांच्या सांगण्यावरून मला भेटायला आले याचं मला खूप कौतुक वाटलं. ती राष्ट्रीय नाट्यशाळेत नाट्यविषयक शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय कीर्तीची अभिनेत्री होईल असं त्या काळात तरी वाटलं नव्हतं. त्यातही शालेय शिक्षण पूर्ण करून “राष्ट्रीय नाट्यशाळे’त प्रवेश घेणाऱ्या जयदेवनं मला पहिल्याच भेटीत आपला शिक्षणावर विश्‍वास नसल्याचे बोलून दाखवले होतं. मीही त्याच्या त्या बोलण्याकडे तेव्हा दुर्लक्षच केलं होतं. जयदेव तसा फार स्पष्टवक्‍ता होता. पण त्याची मतं त्याच्या दृष्टीनं प्रामाणिक असत.

त्यांचं दिल्लीतलं प्रशिक्षण त्यांनी संपवलं आणि उभयता मुंबईत आली. पूर्णवेळ नाटकच करायचं हेच ठरवून आली होती. मध्यंतरीच्या काळात मीही आकाशवाणी-दिल्ली सोडून मुंबईत नव्यानं निघत असलेल्या दूरदर्शन केंद्रात बदलीवर रूजू झालो. ही दोघं तिथंही आवर्जून मला भेटायला आली. परंतु, त्यांना लगोलग काही काम द्यावं अशी व्यवस्था तोपर्यंत दूरदर्शन केंद्रात झालेली नव्हती. उभयतांनी आपापल्या परीनं मुंबईत बस्तान बसवायला सुरुवात केली. तेव्हा मुंबईत अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, विजय तेंडुलकर, अरुण काकडे इत्यादींनी सुरू केलेल्या “आविष्कार’ या हौशी-प्रायोगिक नाटकं सादर करणाऱ्या संस्थेचा खूप बोलबाला होता. उभयतांनी या संस्थेतर्फे “चांगुणा’ या नावाचं नाटक करायचं ठरवलं. जयदेव दिग्दर्शक आणि रोहिणी नायिका.

सत्तरच्या दशकात सुरू झालेला रोहिणीचा हा प्रवास खरं तर आजतागायत अव्याहतपणानं चालू आहे. अर्थात, मध्यंतरी जयदेव मात्र रोहिणीची साथ सोडून देवाघरी निघून गेला. त्यानं असीम हा त्याचा वंशज (मुलगा) मात्र त्याची खूण म्हणून रोहिणीच्या ओटीत घातला. थोडक्‍यात, या उभयतांना असीम या नावाचा मुलगा झाला. तोही सध्या त्याच्या परीनं रंगमंच-चित्रपट-मालिकांच्या क्षेत्रात स्वतःच्या नावाचा ठसा उमटण्याचा प्रयत्न करतो आहे. जयदेवनं काही मोजक्‍याच भूमिका केल्या. त्यानं नाट्यशिबिरं-नाट्य प्रशिक्षणवर्ग किंबहुना नाट्यशास्त्र शिकवणं आणि दिग्दर्शन यावर जास्त भर दिला. ही मंडळी दिल्लीच्या “नाट्य शिक्षण शाळेत’ला तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून नाट्यक्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा मुंबईत आली. त्या काळात नाट्यशास्त्रविषयक शिक्षण-प्रशिक्षणाचं महत्त्व या क्षेत्राला तसं ठाऊक नव्हतं किंवा खरं तर मान्य नव्हतं. पण हळूहळू जसे एकेक दिग्गज प्रशिक्षित नाट्यकलावंत या क्षेत्राकडे येऊन आपलं वेगळेपण सिद्ध करू लागले. तसं तसं नाट्यशाळेतल्या शिक्षण प्रशिक्षणाचं महत्त्व लोक ओळखू लागले.

नाट्यक्षेत्राला या शिक्षणाचं महत्त्व उमगलं. त्यात कमलाकर सोनटक्के, माधव खाडिलकर अशा काही माजी विद्यार्थ्यांनी मुंबईतल्या साहित्य संघाची मदत घेत नाट्यशिक्षणाचे वर्गच सुरू केले आणि त्यात महत्त्वाची भर घातली ती पंडित सत्यदेव दुबे या आणखी एका नाट्यगुरूनं. त्यांनी मराठी नाट्यक्षेत्राला अनेक गुणी कलाकार तयार करून दिले. नाट्यक्षेत्राला शिस्त आणण्याचं काम या मंडळींनी केलं. रोहिणी हट्टंगडीसारखी मान्यवर कलावती कलावंतांना प्रशिक्षित करण्याच्या नादात रमली नाही किंवा तिनं लेखन-दिग्दर्शनाची वाटही फारशी चोखाळली नाही. तिनं “अभिनय’ हेच आपलं क्षेत्र ठरवलं आणि त्या क्षेत्रातच तिनं घोडदौड केली. तिच्या कामाचा वेग हा “सुपरसॉनिक’च मानायला हवा. केवळ मराठीच नव्हे, तर इंग्रजी, गुजराथी-कन्नड, तेलुगु, तमिळ, ओरिसा अशा विविध भाषांमधून तिनं आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. कुठल्याही वादात ती कधी दिसली नाही. उगाचच एखाद्या परिसंवादात वादग्रस्त ठरणारं विधान करून तिनं प्रसिद्धीच्या झोतात राहण्यात धन्यता मानली नाही. अभिनयाधिष्ठित काम एके काम, काम दुणे काम, काम त्रिक काम हाच तिचा काम करण्याचा आणि दर्जा कायम ठेवण्याचा शिरस्ता राहील. ती फारशी कुणाच्या अध्यातमध्यात शिरतानाही दिसली नाही. अभिनय हेच आपलं रंगभूमीच्या सेवेचं प्रधान माध्यम आहे. यावर तिची ठाण श्रद्धा आणि निष्ठाही राहिली.

रोहिणी हट्टंगडीसुद्धा आता साठी ओलांडलेली कलावती आहे. पण गेल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत तिनं तिचे पिताश्री अनंतराव ओक यांना खूपखूप अभिमान वाटला असता इतकं भरीव काम अभिनयाच्या तिन्ही क्षेत्रात म्हणजे रंगभूमी-चित्रपट-मालिकांच्या क्षेत्रांत केलेलं आहे. “चार दिवस सासूचे’ सारखी तिची मालिका मालिकांच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहे, तर ऍटनबरो या नामवंत दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला “गांधी’ या चित्रपटात तिनं महात्मा गांधींच्या पत्नीचं म्हणजे कस्तुरबांचं काम करून उत्तम नावलौकिक तर मिळवलेलाच आहे. पण त्याचबरोबर तिनं तिच्या अभिनयाचे अटकेपार झेंडेही फडकावले आहेत.

ज्या समाजानं आपल्याला एवढं भरभरून दिलं त्या समाजाचं आपणही काही देणं लागतो याची जाणीव ठेवून “सामाजिक कृतज्ञता निधी’साठी पैसे जमवण्याच्या उद्देशानं डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, तनुजा अशा मान्यवर कलाकारांनी आचार्य प्र. के. अत्रे यांच्या “लग्नाची बेडी’ या नाटकाचे गावोगावी प्रयोग ठरवताच रोहिणीनंसुद्धा या प्रयोगांमध्ये एक मध्यवर्ती भूमिका करून निधी संकलनासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडली. अशा या कलावतीनं “चांगुणा’, “लग्नाची बेडी’ अशी किती नाटकं आणि त्यांचे असंख्य प्रयोग गावोगावी जाऊन केले. तसंच तिनं “वहिनीसाहेब’, “होणार सून मी या घरची’, “थोडा है थोडे की जरुरत है’, अशा लोकप्रिय चित्रवाणी मालिका केल्या. चित्रपटांची संख्या तर खूपच मोठी आहे. “अर्थ’, “सारांश’, “मोहन जोशी हाजीर हो’, चालबाज, सिवा, अग्निपथ, रात, मुन्नाभाई एमबीबीएस, जलवॉं, लडाई, आकर्षण, “पार्टी’, “प्रतिघर’ या साऱ्याचा तपशील आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध होऊ शकतो. पण या अशा कलावतींचं कार्यकर्तृत्व कळायला आणि त्यांच्या मनाची जडणघडण समजायला त्यांच्याशी थोडासा परिचय असायला हवा.

डॉ. विश्‍वास मेहेंदळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.