साताऱ्यात भुयारी गटर कामामुळे रस्त्यांची चाळण

आठ दिवसांत रस्त्यांची कामे न झाल्यास आंदोलन करणार : अविनाश कदम
सातारा – सातारा शहरात भुयारी गटर योजनेचे काम सुरू आहे. शहरातील व्यंकटपुरा पेठ आणि मंगळवार पेठेचा काही भाग याठिकाणी सुमारे 8 महिन्यांपूर्वी भुयारी गटर योजनेच्या पाईपलाईन टाकल्या आणि चेंबर बांधण्यात आले आहेत मात्र, काम झाल्यानंतर उकरलेल्या रस्त्यांचे पॅचिंग अथवा खडीकरण, डांबरीकर केले गेले नाही. त्यामुळे या भागात नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.

पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते त्यामुळे पालिका प्रशासनाने येत्या आठ दिवसांत या भागातील रस्त्यांचे काम करावे, अन्यथा नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा नगर विकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी दिला आहे. यासंदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात कदम यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरात भुयारी गटर योजनेचे काम सुरु होते. मंगळवार पेठेतील खांबेटे बोळ आणि शहाणे बोळ तर, व्यंकटपुरा पेठेत सर्वच ठिकाणी भुयारी गटर योजनेच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या तसेच चेंबरही बांधण्यात आले आहेत. यासाठी संबंधित ठेकेदाराने रस्त्यांची खुदाई केली आहे.

भुयारी गटर योजनेचे काम पूर्णत्वास जाऊन आता 8 महिने उलटले आहेत तरीही खोदलेल्या रस्त्यांकडे पालिका प्रशासन आणि संबंधीत ठेकेदाराने अक्षम्य असे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यांचे पॅचिंग न झाल्याने नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. पावसाळा तोंडावर आला असून या रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण झाले नाही तर, नागरिकांपुढे गंभीर समस्या उभी राहणार आहे. रस्त्यांची कामे करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी यांच्यासह बांधकाम विभागाचे अभियंता सर्वचजण रजेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागरिकांना गंभीर समस्येने ग्रासले असताना पालिकेत मात्र कोणीही हजर नाही अशी गंभीर परिस्थिती आहे. संबंधित ठेकेदाराकडे रस्त्यांच्या कामाबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत तर, पालिकेचे अभियंता साबळे यांच्याकडे विचारणा केली असता ठेकेदाराचे काम आहे आम्ही काय करणार? अशी बेजबाबदार उत्तरे मिळत आहेत. पालिका प्रशासनास नागरिकांच्या समस्यांचे काहीही देणेघेणे नसल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.
नागरिकांना होत असलेला नाहक त्रास दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने येत्या आठ दिवसांत मंगळवार पेठ आणि व्यंकटपुरा पेठेतील रस्त्यांचे काम करून द्यावे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा अविनाश कदम यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)