युवकांनी स्वखर्च व श्रमदानातून तयार केला रस्ता

ग्रामपंचायती विरोधात युवकांचे गांधिगिरी पद्धतीने आंदोलन
कराड –
गोवारे ग्रामपंचायत व स्थानिक सदस्यांचे रस्ता दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी, यासाठी अष्टविनायक मित्र गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून व श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली. मंडळाच्या माध्यमातून युवकांनी स्वखर्चातून व श्रमदानातून केलेल्या रस्ते दुरुस्तीमुळे पावसाळ्यात स्थानिक रहिवाशांसह गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती नेण्यासाठी येणाऱ्या लोकांची खड्ड्यापासून मुक्तता झाली आहे. याबाबत युवकांचे कौतुक होत आहे.

गोवारे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गजानन, रत्नदीप, साईकृपा हौसिंग सोसायटीसह पी. डी. पाटीलनगर, चौंडेश्‍वरीनगर आदी भाग येतो. गजानन सोसायटीत पूर्वेकडील बाजूस पालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीपासून चौंडेश्वरी नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहन चालवताना तसेच पादचाऱ्यांना चालतानाही मोठी कसरत करावी लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी नागरिक ग्रामपंचायतीकडे विनवण्या करतात. मात्र मुरूम टाकण्याची कार्यवाही पावसाळा संपताना होते.
ग्रामसभेतही यावर बरीच चर्चा झाली होती.

मात्र काहीच कार्यवाही न झाल्याने ग्रामपंचायत तसेच स्थानिक सदस्यांच्या नाकर्तेपणाबद्दल नाराजी व्यक्त करून श्री अष्टविनायक मित्र गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याची भूमिका घेतली. त्यानुसार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून मुरूम आणला. कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजवले. कार्यकर्ते स्वतःहून खड्डे बुजवत असल्याने स्थानिक रहिवाशांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच याबाबत ग्रामपंचायतीने कोणताच पुढाकार न घेतल्याने या गांधारीच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

मंडळाचे कार्यकर्ते शंकर कोळगे, रमेश जाधव, स्वानंद माळी, अक्षय महाडिक, समीर महाडिक, धीरज कोळगे, विवेक भोसले, वैभव भोसले, निखिल पाटील, आनंद गायकवाड, अर्जुन गायकवाड, सागर काशीद, गणेश काशीद, नागेश काशीद, अतुल तुपे, मनोज यादव, रोहित नाटकर, रोहित पाटील, गणेश करडे आदींसह परिसरातील कार्यकर्त्यांनी श्रमदानाने रस्त्यावर मुरूम टाकला.

Leave A Reply

Your email address will not be published.