मुंढवा, दि. 5 (प्रतिनिधी) – मुुंढवा परिसरात सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी साचले आहे. गांधी चौक, रेल्वे उड्डाणपूल रस्ता, केशवनगर ओढापुलावर, मुंढवा नदीपुलावर, हडपसर रेल्वे स्टेशन, धायरकर वस्ती अशा अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले.
मुंढव्यातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ रस्त्यावर पाण्याचे मोठे तळे झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. मुंढवा परिसरात पावसाळी वाहिन्या सफाईचे काम झाले नसल्याचे महानगरपालिकेची पावसाळी पाणी निचरा व्यवस्था सक्षम नाही, अनेक ओढे-नाले बुजविल्यामुळे ही परिस्थिती ओढविली असल्याचे यातून उघड झाले आहे.
मुंढवा-केशवनगर येथील सर्वच भागात पाणी साचल्यामुळे पाणी वाहून जाण्यास मार्ग निघत नव्हता. रेल्वे पुलाजवळ मुख्य रस्त्यावरही पाणी साचल्याने दुचाकी व तीनचाकी वाहने बंद पडली होती. पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढवा लागला. कीर्तनेबाग, रेल्वे स्टेशनरोड परिसरात पावसाचे पाणी साचल्याने मोठमोठी तळी निर्माण झाली होती.
मुंढवा-केशवनगर येथील सर्वच ठिकाणी पावसाळी पाण्याचे नियोजन करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. दरम्यान, पालिका प्रशासन या भागाला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा झाला आहे. पण, त्यावर पालिकेने काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत.
मुंढव्यात रस्त्यावर नदी अवतरली……
मुंढवा परिसराला अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीने ग्रासलेले असताना त्यात पावसाचे पाणी साचून वाहन चालकांच्या अडचणीत भर पडली. रेल्वे उड्डाणपुलाजवळचा रस्ता अरुंद आहे. येथे पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यातच खड्ड्यांमुळे स्थिती गंभीर झाली आहे. आठवडाभर पावसाने उघडीप दिल्यानंतरही खड्डे बुजविण्यात आले नाहीत.