जामखेड शहरातील रस्ते उठले वाहन धारकांच्या जीवावर

खर्डा रस्त्यावरील जीवघेणा खड्डा बुजवण्याकडे दुर्लक्ष
जामखेड – परतीच्या पावसानंतर जामखेड शहरातील सर्वच प्रमुख व अंतर्गत रस्त्यांची स्थिती बकाल झाली आहे. खर्डारोड,बीड रोड नगररोडवर काही ठिकाणी तर डांबरीकरणाच्या रस्त्याला गाडरस्त्याचे स्वरूप आले आहे. शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवर मोजता येणार नाहीत इतके चार ते पाच फूट लांब व सव्वा फुटापर्यंत खोलीचे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची हाडे खिळखिळी झाली आहेत.

शहरातील खर्डा चौक ते खर्डा गावापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण ,नूतनीकरण होणार असून खर्डा चौक ते लक्ष्मीआई मंदिरापर्यंत रस्त्यावर डिव्हायडर टकून दुपदरीकरण होणार आहे या कामासाठी ६ कोटींचा निधी मंजूर झाला मात्र हे काम रेंगाळयाने या रस्त्यावर तब्ब्ल दोन ते अडीच फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत या रस्त्यावरील पाचशे मीटर अंतराच्या रस्त्यावर ३५ ते ४० खड्डे पडले अाहेत. त्यातही पाच ते सहा खड्ड्यांचा आकार इतका माेठा अाहे की, त्यात दुचाकीचे अर्धेचाक जाते. बस, चारचाकी वाहने खड्ड्यातून गेल्यावर एका बाजूला कलंडतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात हाेण्याचा धाेका वाढलेला अाहे. बस अचानक खड्ड्यात गेल्यावर बसमधील प्रवाशांना दणका बसतो. पडलेला जीवघेणा खड्डा बुजवण्याकडे सार्वजनिक बांधकाम प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अपघातात एखाद्याचा जीव गेल्यावर हा खड्डा बुजवला जाईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तर दुसरीकडे सर्वात रहदारीचा रास्ता असणारा नगर ते बीड महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, पावसामुळे स्थिती अधिक भयावह झाली आहे.,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने शहरातून जाणाऱ्या सर्वच रस्त्याची वाट लागली आहे आता फक्त या रस्त्यावर डांबराच्या केवळ काही खुणाच शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे. खड्ड्यात रस्ते की, रस्त्यात खड्डे हे ओळखणे कठीण झाले आहे. परिसरातील बहुतांश रस्ते हे एक किंवा दोन वर्षापूर्वी बांधकाम व दुरुस्ती झालेले आहे. रस्ते बांधकाम व दुरुस्तीच्या कामामध्ये ठेकेदाराच मनमानी कारभार चालत असल्याने बांधकाम साहित्य हे निकृष्ट दर्जाचे वापरून सर्रास रस्त्याची कामे केली जात आहेत. त्यामुळे पावसाळा नसला तरी अल्पावधीतच रस्त्याच्या चिंधड्या होतात. यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाळा असल्याने ठेकेदार व बांधकाम विभागाची झाकली मुठ लाखाची झाली आहे.

परिसरातील मुख्य रस्त्यावर असणारी वाहनांची वर्दळ पाहता या रस्त्यांची सतत देखभाल व दुरुस्ती होणे गरजेचे आहे. परंतु संबंधित विभागाकडून रस्त्याची झालेली दयनीय अवस्थेची पाहणी करून त्यावर उपाय योजना करण्याची तसदी अद्याप घेण्यात आलेली नाही. या गंभीर समस्येकडे बांधकाम विभागाने झोपेचे सोंग न घेता उघड्या डोळ्यांनी पाहून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहे..ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवावे कुठून असा प्रश्न निर्माण होतो. काही ठिकाणी खड्डे इतके खोल आहे की या खड्ड्यातून वाहन गेल्यावर ते उलटण्याची भीती असते. पावसामुळे महामार्गावरील खड्ड्यात ठिकठिकाणी पाणी साचले असून, वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचेही अतोनात नुकसान होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

लाेकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…
महामार्गाच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधींनीदेखील पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लागलीच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने काम करता येत नाही असे अधिकारी सांगत होते. आता विधानसभा निवडणूक आटोपली असून, आचारसंहिताही संपली आहे. त्यानंतरही दुरुस्तीचे काम होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

डांबरीकरणावर मुरूमाचा थर
शहरात पावसाळ्यात गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे मुरुमाने बुजवण्याची अतांत्रिक पद्धत गेल्या पाच ते सात वर्षांपासून उदयास आली आहे. मुळात डांबरीकरणाच्या रस्त्यावर हॉटमिक्स किंवा कोल्डमिक्सचा वापर होणे अपेक्षित आहे. मात्र शहरात सर्रासपणे मुरुमाचा वापर केला जातो. पावसाळ्यात मुरूम वाहून निघतो तर खड्ड्यांत पाणी साचून त्यांचा आकार वाढतो. यामुळे मुरुमाची अतांत्रिक पद्धत बदलून डांबरीकरणाने खड्डे बुजवणे अपेक्षित आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.