जामखेड -शहरात गुरुवारी रात्री आणखी एक व्यक्ती करोना पॉझिटीव्ह आढळल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी गल्लीत येणारे लहानमोठे रस्ते काटेरी झुडपे टाकून व बॅरिकेटिंग करून बंद केले आहे.
तर प्रशासनाने ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत, त्या परिसरातील रस्ते पत्रे आडवे लावून पुर्ण बंद केले आहेत. प्रशासनातर्फे आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. करोनाचा नव्याने एक रुग्ण आढळल्याने शहरातील करोना बाधितांची संख्या ही बारावर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 4 व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत. तसेच करोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे.