पिंपळे गुरव -पिंपरी चिंचवड शहरात आणि उपनगरांमध्ये आज उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवला. दुपारी बारानंतर उन्हाची तीव्रता वाढत गेली. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीव उन्हाने कासावीस होत होता. तर गजबजलेले रस्ते आज मोकळे दिसून येत होते.
पुणे-मुंबई महामार्गावरून दापोडीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर कायम गर्दी पाहण्यास मिळते. या पुलावरून बोपोडी, जुनी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात जाण्यासाठी मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच रेलचेल दिसून येते. परंतु आज उन्हाची तीव्रता एवढी होती की दुपारी अक्षरशः उड्डापूल रिकामा दिसून येत आला. पुलावर एखाद दुसरी गाडी ये-जा करताना दिसून येत होती. तसेच उपनगरांमधील इतर रस्ते देखील उन्हाच्या तीव्रतेमुळे सुनेसुने दिसून येत होते.
शहरातील नागरिक सकाळी अकरानंतर घराबाहेर पडणे टाळत आहेत. ज्या नागरिकांना कामावर जायचे आहे अशाच व्यक्ती दुपारी प्रवास करताना दिसून येत आहेत. दुपारी उन्हाची तीव्रता एवढी असते की नागरिक आपली कामे ऊन कमी झाल्यानंतर सायंकाळी करत आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते व उपनगरांमधील मुख्य रस्ते अक्षरशः मोकळे दिसून येत आहेत.