आळंदीत येणाऱ्या रस्त्यांची धुळदाण

यंदा वारकऱ्यांची वाट बिकट : मरकळ रस्त्याची अक्षरश: चाळण

आळंदी – आळंदी ते मरकळ व्हाया वाघोली फाटा या सतरा कि.मी. रस्त्यासोबतच आळंदीत येणाऱ्या अनेक रस्त्यांची धुळधाण उडाली असल्याने आळंदीत कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची यंदा वाट बिकट असणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आळंदीपासून थेट लोणीकंद फाट्यापर्यंत ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर वाहनांचेही मोठे नुकसान होते असलेले तरी या खड्ड्यांमुळे अक्षरशः कंबरडे मोडत असल्याचे प्रतिक्रिया या रस्त्याने जा-ये करणाऱ्यांनी दिल्या आहेत. आळंदीची कार्तिकी वारी ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, संपूर्ण मराठवाड्यातून येणारे भाविक हे याच मार्गे आळंदीला येत असतात, त्यामुळे हा एकमेव प्रमुख मार्ग मराठवाड्यातून आळंदीला जोडणारा आहे, तरी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद पंचायत समिती त्या-त्या ठिकाणच्या ग्रामपंचायती, अधिकारी-पदाधिकारी, आमदार, खासदार, स्थानिक कार्यकर्ते यांनी तातडीने पावले उचलावीत व युद्ध पातळीवर हा 17 किलोमीटरचा रस्ता हा येथे आठ दिवसांच्या आत दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी जोर धरीत आहे.

याचबरोबर आळंदी-चऱ्होली खुर्द, आळंदी-केळगाव, आळंदी-वडगाव घेनंद रस्ता हे रस्तेही खड्ड्यात गेले असल्याने या रस्त्यांची यात्रेपूर्वी दुरुस्ती करणे गरजेचे आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. 15) होणाऱ्या नियोजन बैठकीत संबंधित खात्याने या रस्त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हे रस्ते सुस्थितीत
पुणे-आळंदी, आळंदी-देहू व आळंदी-चाकण हे रस्ते सुस्थितीत आहेत, त्याचबरोबर चिंबळी ते केळगाव या रस्त्याचे देखील काम पूर्णत्वाकडे असल्याने या रस्त्यावरून आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांची वाट सुखद असणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.