भुईंज बसस्थानकात रोडरोमिओंची दहशत

विद्यार्थीनींसह महिला प्रवासी त्रस्त, ठोस कारवाईची मागणी

भुईंज एसटी स्टॅंडसमोर उभे राहून मुलींना नाहक त्रास देणाऱ्या विरोधात 20 वर्षांपूर्वी भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक फत्तेसिह पाटील यांनी तर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांनी पाच वर्षांपूर्वी मोहीम उघडून रोडरोमिओंना चांगलाच चोप देऊन पोलिसी खाक्‍या दाखवला होता. रोडरोमिओंची भर रस्त्यात धुलाई केली होती. त्यामुळे सध्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्‍याम बुवा यांनीसुद्धा अशाच प्रकारे कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भुईंज  – भुईंज (ता. वाई) येथील बसस्थानकात उभ्या असलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना येथील फाळकूट रोडरोमिओ नाहक त्रास देत असून या रोडरोमिओंविरोधात भुईंज पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी, मागणी मुलींच्या पालकांकडून होत आहे.

वाई, सातारा, पाचवड, तसेच भुईंज येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थींनींची संख्या मोठी आहे. या विद्याथींनी बसने प्रवास करत असून बसची वाट पाहत त्यांना अनेकदा भुईंज येथील बसस्थानकात थांबावे लागते. नेमके या विद्यार्थीनींच्या घरी जाण्याच्या वेळेतच भुईंज येथील काही भुरटे रोडरोमिओ स्थानकासमोर असणाऱ्या उड्डाणपुलाखाली टोळक्‍याने उभे असतात. अनेकदा स्थानकाच्या आवारात उभ्या असणाऱ्या मुलींच्या बाजुने दुचाकीवरुन डोमकावळ्यासारखे गिरट्या घालत असतात. वारंवार होत असलेल्या या घटनांमुळे विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मुलींनी ही बाब आपल्या पालकांनादेखील सांगितली असून या भुरट्या रोडरोमियोंवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली
आहे.

पालकांच्या तक्रारी वाढल्यामुळे अधूनमधून पोलीस कर्मचारी याठिकाणी ठाण मांडून असतात. यावेळी मात्र हे भुरटे बसस्थानकाच्या आवारात दिसत नाहीत. मात्र, जेव्हा पोलीस नसतील त्यावेळी रोडरोमियोंची टोळकी निश्‍चित याठिकाणी असतातच. दरम्यान, शाळा सुटण्याच्या वेळेत भुईंज बसस्थानकात कायमस्वरुपी पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.