पोलिसांच्या नशिबी तुटक्‍या इमारती अन्‌ खड्ड्यांचा रस्ता

प्रशांत जाधव
सातारा  – जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या गोडोली येथील पोलीस वसाहतीतील काही इमारतींची दुरवस्था झाली आहे. सर्वसामान्य लोकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या नशिबी मात्र आजवर हेळसांडच आली आहे. वसाहतीतील नादुरुस्त रस्त्यावरून जाताना याठिकाणी वारंवार अपघात घडत असून त्यासाठी निवेदनेही देण्यात आली मात्र, परिणाम शून्यच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पोलीस वसाहतीमधील घरांच्या खिडक्‍यांच्या काचा तुटल्याने सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
पोलीस वसाहतीत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्याकडेला खडी टाकण्यात आली आहे. मात्र अद्याप कामाला सुरुवात न झाल्याने हीच खडी वाहतुकीस अडथळा ठरू लागली आहे.

इमारतीच्या ऑडिटची आवश्‍यकता
पोलीस वसाहतीतील इमारतींच्या बांधकामांना सत्तावीस वर्षे पूर्ण झाली आहेत. बांधकामानंतर आजपर्यंत याठिकाणी कोणत्याही सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अनेक इमारतींच्या पाठीमागील भाग घुशींनी पोखरल्याने इमारतींना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने या इमारतींचे ऑडिट करून घ्यावे, अन्यथा भविष्यात मोठ्या अनर्थाची शक्‍यता नाकारता येत नाही.

पोलीस वसाहतीत विद्युत पुरवठा करणाऱ्या फ्युजबॉक्‍स अशा प्रकारे सताड उघडा असल्याने दुर्घटनेची शक्‍यता निर्माण झाली आहे. पोलीस वसाहतीकडे जाणाऱ्या आणि वसाहतीमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून अर्ध्या रस्त्यावर डांबर अन्‌ खडीदेखील राहिलेली नाही. पोलीस वसाहतीतील इमारत क्र. 9 च्या पाठीमागील बाजूस घुशींनी इमारतीचा काही भाग पोखरल्याने खचलेल्या फरशा.

वसाहतीच्या परिसरात सर्वत्र गाजर गवत पसरले आहे. उघड्यावर असलेले फ्यूज बॉक्‍स व धोकादायक विजेच्या तारा, तुटलेल्या खिडक्‍या व दरवाजे, उघड्यावर व तुटलेल्या अवस्थेत असलेले ड्रेनेज, तुंबलेली गटारे यामुळे पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
या वसाहतीतून जाणाऱ्या रस्त्यावर नेहमीच नागरिकांसह वाहनांची वर्दळ असते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचीदेखील अतिशय दुरवस्था झाली आहे.

रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबातील लोकांना या खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जवळपास 27 वर्षांपूर्वी बांधलेल्या या तीस इमारतींच्या 240 खोल्यांच्या वसाहतीत बांधकामानंतर आवश्‍यक त्या सुविधा पुरविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असतानादेखील त्याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाची हेळसांड थांबविण्यासाठी या वसाहतीची दुरुस्ती करून त्यामध्ये मूलभूत सुविधा प्रदान करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

पोलीस वसाहतीची झालेली दुरवस्था व त्यावर आवश्‍यक असलेले उपाय या दोन्ही गोष्टी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणल्या आहेत. रस्त्यासंदर्भातही बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी काही प्रमाणत खडी टाकली. मात्र, पावासामुळे पुढील काम करता येत नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

तेजस्वी सातपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)