नेवासा – भर पावसात मालवण येथील घटनेच्या निषेधार्थ नेवासा फाट्यावरील राजमुद्रा चौकात शिवप्रेमीकडून नगर – संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्ते संभाजी माळवदे यांनी छत्रपतींचा पुतळा कोसळला , बदलापूर येथे आमच्या बहिणीवर अत्याचार झाले, शेतकरी आत्महत्या करू राहिले, विद्यार्थी आत्महत्या करत आहे, मराठा आरक्षण प्रश्न चिघळत आहे. शासकीय भरतीमध्ये घोटाळा झाले, अशा अनेक विषयावर आवाज उठविल्यास सरकार म्हणते राजकरण करू नका, असे किती दिवस जनतेला गप्प बसविणार, याचा ज्वालामुखी आता फुटणारच, असा संताप व्यक्त केला.
ॲड.कल्याणराव पिसाळ यांनी पुतळ्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर, बिल काढणाऱ्यांवर, यात सहभागी व्यक्तीवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी केली. रावसाहेब घुमरे, गणेश झगरे, गणपत मोरे, आकाश धनवटे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. जय भवानी..जय शिवाजी.. जय जिजाऊ..जय शिवरायच्या.. घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात काँग्रेसचे अंजूम पटेल, सतीश तऱ्हाळ, संतोष काळे, बसपाचे विकास चव्हाण, बबलू डांगे, तुषार उंदरे, शेषराव गव्हाणे, त्रिंबक भदगले, मीराताई गुंजाळ, सुमित पटारे यांच्यासह नेवासा तालुक्यातील शिवप्रेमींनी सहभाग घेतला. यावेळी आंदोलकांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज आहिरे यांना निवेदन दिले.