फुरसुंगी, दि. 12 (प्रतिनिधी) -महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या हांडेवाडी गावात ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परीषद शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चिखल झाला असून खड्डे व डबकी तयार झाली आहेत. शाळेत जाणारे लहान विद्यार्थी पाय घसरून, सायकल घसरून पडत आहेत. वाहनांमुळे अंगावर चिखल उडाल्याने गणवेश खराब होत आहे. महापालिकेच्या रस्ते विभागाने या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अन्यथा पालिकेत “चिखल फेको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हांडेवाडीचे माजी उपसरपंच अशोक न्हावले यांनी दिला आहे.
हांडेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात दररोज विविध कारणांसाठी नागरीकांची ये-जा सुरू असते तसेच याच रस्त्याने जिल्हा परीषद शाळेत दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. परंतु, रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने शाळेत जाणे-येणे अवघड झाले आहे.
या भागासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने टॅंकर चालकही रस्त्यातच टॅंकर उभा करत असल्याने पाणी भरताना मोठ्या प्रमाणात पाणी सांडते व ते पाणी रस्त्यावरुन वाहून शाळेच्या परीसरात जावुन थांबते, त्यामुळे पालिकेच्या टॅंकर चालकांनाही याबाबत सूचना करणे गरजेचे आहे. तसेच, या भागासाठी टॅंकरऐवजी बंद नलिकेद्वारे पाणीपुरवठा केल्यास हा रस्ता खराब होणार नाही. पालिका प्रशासनाने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून रस्ता चालण्यायोग्य करावा, अन्यथा याच रस्त्यावरील चिखल पालिकेत फेकू, असा आंदोलनाचा इशारा माजी उपसरपंच न्हावले यांनी दिला आहे.