पाइपलाइन दुरुस्तीनंतर रस्ता उखडलेलाच; स्थानिकांसह वाहनचालकांमध्ये संतापाची लाट
वाई – वाईतील सिद्धनाथवाडीत गेल्या दोन महिन्यांपासून नव्या पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पालिकेच्या ठेकेदाराने रस्ता आठ ते नऊ ठिकाणी खोदून ठेवला आहे. पाइपलाइनच्या कामाचा दर्जा योग्य नसल्याने आज केलेल्या कामाच्या जागी दुसऱ्या दिवशी गळती होत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी वारंवार खुदाईचे काम करायला लागत असल्याने पाचशे मीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
त्यामुळे स्थानिकांसह वाहनचालकांमधून संतप्त भावना उमटत आहेत.
सिद्धनाथवाडीतील अवघ्या पाचशे मीटर रस्त्याचीही दुरवस्था झाल्याने ठेकेदाराच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून लवकरच पालिका प्रशासनाला ग्रामस्थ व वाहनचालक निवेदन देणार आहेत.
सिद्धनाथवाडीतील अंबाई मंदिराजवळून कृष्णा नदीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून संथगतीने होत आहे. अशा ठेकेदारावर पालिका प्रशासनाने कारवाई करावी व तज्ज्ञ असलेल्या ठेकेदाराकडे काम द्यावे, अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या मध्यभागी पाइप जोडण्याचे काम सुरू असताना वाहनचालकांची फसगत न होण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष असल्याने हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. लोकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार थांबवून रस्त्याचे व पाइपलाइनचे काम वेळेत पूर्ण व्हावे, अशी मागणी होत आहे.