कोल्हापूर : प्रतिनिधी-रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्ताने वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांसाठी कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांनी आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. नेहमी दंड लावूनही अनेक वाहन चालक नियम पाळत नसल्याने वाहतूक पोलिस आता गांधीगरी करताना दिसत आहेत.
जे वाहतुकीचे नियम नियमित पाळतात, त्यांना गुलाबाचे पुष्प दिले जात आहेत. तर जे नियम पाळत नाही त्यांनी नियमावलीचे पत्रक देत कायदा पाळण्याचे आवाहन शहरातील विविध सिग्नलवर पोलीस देत आहेत.
कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडीसाठी वाहनधारकांची बेशिस्तच कारणीभूत ठरत आहे. नियमांचे पालन करण्याऐवजी नियम मोडण्याकडेच वाहनधारकांचा अधिक कल असल्याने वाहतूक कोंडी जीवघेणी ठरत आहे.
वारंवार सूचना देऊनही वाहनधारक नियमांचे पालन करीत नाहीत. उलट पोलिसांनाच दमदाटी करून रुबाब केला जातो. अशा प्रवृत्तीला स्थानिक लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत असल्याने वाहतुकीला शिस्त लावणे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
आता रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने शहर वाहतूक नियंत्रण शाखेने बेशिस्त वाहनधारकांच्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. चुकांबद्दल वाहनधारकांना दंड करण्याऐवजी त्यांना फुले देऊन सर्वांसमोर सत्कार केला जात आहे.
या उपक्रमातून खजिल होऊन वाहनधारक नियमांचे पालन करतील, अशी अपेक्षा शहर वाहतूक नियंत्रण शाखेला वाटते. म्हणूनच रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्त कोल्हापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.
दंडात्मक कारवाईनंतरही अनेक वाहनधारकांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकांच्या विरोधात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे.
शहरातील कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर आणि सीपीआर चौकात शालेय विद्यार्थिनींसह पोलिसांनी ट्रॅफिक सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर थांबणाऱ्या वाहनधारकांना गुलाबाची फुले देऊन त्यांची चूक दाखवून दिलीय.
भारती विद्यापीठाच्या विद्यार्थिनींसह वाहतूक पोलिसांनी कावळा नाका येथून गांधीगिरीला सुरूवात केली. विद्यार्थिनींनी ट्रॅफिक सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर येऊन थांबणाऱ्या वाहनधारकांना गुलाब फुले देऊन त्यांची चूक दाखवून दिली. यानंतर दाभोळकर कॉर्नर, व्हीनस कॉर्नर आणि सीपीआर चौकातही अशाच प्रकारे नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना गुलाब फुले देऊन विशेष सत्कार करण्यात आला.