पुणे: शहरातील रस्ते खोदाई आणि त्यानंतर त्यावर केल्या दुरूस्ती खर्चाचा भार पुणेकरांच्या माथी मारण्यासह ; या खोदाई सोबत वाहतूकीचा मनस्ताप पुणेकरांना मोफत देणाऱ्या पुणे महापालिकेने रस्ते खोदा… बुजवा.. दुरूस्त करा आणि पुन्हा खोदा असा नवा उपक्रमच शहरभर सुरू केला आहे. त्याची प्रचिती पुन्हा एकदा विधी महाविद्यलय रस्त्यावर आली असून अवघ्या आठवडयापूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता पुन्हा फूटपाथच्या कामासाठी खोदण्यात आला आहे.
असा आहे खोदाईचा “प्रताप’
विधी महाविद्यालय रस्त्यावर गेल्या महिन्याभरापासून समान पाणी योजनेची जलवाहीनी टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी सेनापती बापट रस्त्याकडून नळस्टॉप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला खोदाई करण्यात आली होती. हे काम संथगतीने सुरू असल्याने त्या मार्गावर वाहतूक कोंडी होत होती. हे काम झाल्यानंतर जलवाहीनी टाकणाऱ्या ठेकेदाराने केवळ खोदलेल्या भागाचे कॉंक्रीटीकरण केले.
त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयात पंतप्रधानांचा दौरा निश्चित झाला. त्यात, त्यांचा ताफा कोथरूड मधून कृषी महाविद्यालयातून विमानतळाकडे याच रस्त्याने जाणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे महापालिकेने तातडीनं पूर्ण सेनापटी बापट रस्त्याचे डांबरीकरण केले. रातोरात या रस्त्यावर सुरक्षा पट्टे मारत रस्ता चकाचक करण्यात आला. पंतप्रधान परत जाताच या मार्गावर जलवाहीनीसाठी फूटपाथ फोडल्याची आठवण महापालिकेस झाली.
त्यामुळे, पुन्हा फूटपाथ करण्याची लगबग सुरू झाली असून त्यासाठी चक्क डांबरीकरण केलेला रस्ता खोदण्यात येत आहे. त्या पेक्षाही वाईट म्हणजे; ज्या ठिकाणी समान पाणी योजनेची जलवाहीनी टाकली आहे. त्यावर टाकण्यात आलेला कॉंक्रीटचा थर चक्क ब्रेकर लावून फोडला जात असून त्यावर सिमेंटचे कार्बिंग लावले जाणार आहे. त्यामुळे जलवाहीनीत काही बिघाड झाल्यास पुन्हा एकदा फूटपाथ तोडावा लागणार आहे.