श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या उजव्या कालव्यावरील रस्त्याची दुरवस्था
मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर (ता. आंबेगाव) येथे जाणाऱ्या मंचर येथील उजव्या कालव्यावरील रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहने संथगतीने धावत असून, वाहतुक कोंडी होत होती. मंचर पोलिसांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी गुरुवारी (दि. 20) स्वतः मेहनत घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे न बुजवता पोलिसांनी खड्डे बुजविल्याने ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी मंचर येथून जात असतात. सध्या मंचर-घोडेगाव रस्त्यावरील बाजारपेठेत रस्त्याचे काम चालू असल्याकारणाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. त्याला पर्यायी रस्ता म्हणून उजव्या कालव्यावरील रस्त्याचा वापर केला जातो.
मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहतूक संथ गतीने होऊन वाहतूक कोंडी होत होती. ही बाब मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या लक्षात आली. पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलीस नाईक विनोद गायकवाड यांनी स्वतः जेसीबी मागवून खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.