ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था

– संतोष वळसे पाटील

तालुक्‍यातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून, राजकीय पुढारीच ठेकेदार झाल्याने अधिकाऱ्यांना ते दाद देत नसल्याचे दिसत आहे. रस्ते दुरुस्ती किंवा नवीन होण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात, तरीही रस्ता फार काळ टिकत नाही.

तालुक्‍यात सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे होतात. रस्त्यांसाठी मोठा निधी येतो; परंतु रस्त्यांच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. विविध पक्षाच्या राजकीय पुढारी शासकीय कामे घेऊन ठेकेदार झाले आहेत. पक्षीय नेत्यांचे आशीर्वाद असल्याने पुढारी मात्र, अधिकाऱ्यांना दाद देत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून कामे मिळविताना ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला असला तरी विविध पक्षांचे ठेकेदार पक्षीय जोडे बाजूला ठेऊन संगनमत करून एकत्रितपणे काम करतात. ठेका घेण्यासाठी ठरवून एकानेच काम घ्यावे यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे काम घेतले म्हणजे निम्म्या पैशातच झाले पाहिजे. उर्वरित पैसे खिशात गेले पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतात.

काही शासकीय अधिकारी ठेकेदाराच्या टक्‍केवारीत निमताळे आहेत. रस्त्याच्या कामांचा दर्जा चांगला नसल्याने वर्षभरात लाखो रुपये पाण्यात जातात. रस्ता करताना दुतर्फा गटारे खोदली जात नाहीत. पावसाचे किंवा शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही सोय नाही. रस्ता करताना त्याची पुरेशी खोदाई, खडी, मुरुमांचे अस्तरीकरण किंवा डांबराचा दर्जा याबाबत शंका आहे. रस्त्याच्या गॅरंटी पिरिअडनुसार अधिकाऱ्यांनी ठेकेदारांकडून काम करून घेतले पाहिजे; परंतु तसे काहीच होत नाही. रस्त्यासाठी येणारे पैसे म्हणजे ठेकेदारांची चंगळ असाच अर्थ ग्रामस्थ काढत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.