आमची हद्द निश्‍चित करून रस्ता खुला करा

दोन तालुक्‍यांचा शिव रस्ता : दोन्ही गावे अनुकूल

केंदूर – वाजेवाडी (ता. शिरूर) आणि सिद्धेगव्हाण (ता. खेड) या दोन्ही गावांचा शिव रस्ता दररोजच्या शेतकऱ्यांच्या वापरातील आहे. मात्र, हद्द निश्‍चित नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. वर्षानुवर्षे आलेल्या वाजेवाडी आणि सिद्धेगव्हाण या दोन्ही गावांच्या हद्दीच्या मध्यभागी नकाशात रस्ता असल्याची नोंद आहे. तो रस्ता थेट पुढे चाकण-शिक्रापूर महामार्गाला जाऊन मिळतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता शेतकरी कसाबसा वापरत आहेत.

जुन्या बांधाचा आसरा घेत कसरत करून शेतकरी दलदलीतून रस्ता काढत शेतीमाल मुख्य रस्त्याला आणत आहेत. शेतकऱ्यांची पायपीट होत आहे. रस्ता दोन्ही तालुक्‍याच्या सीमारेषेवर असल्याने दोन्ही तालुक्‍याच्या प्रतिनिधींना त्याचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांना या रस्त्याने पायी चालणेदेखील मुश्‍किल होत आहे. रस्त्याची हद्द निश्‍चित नसल्याने शेतकरी कधी बांधावरून तर कधी बांधाच्या खालून शेतीमाल डोक्‍यावरून वाहून नेत आहेत. सिद्धेगव्हाण आणि वाजेवाडी या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना हा रस्ता सर्वात महत्त्वाचा आहे.

दोन्ही गावचे शेतकरी या रस्त्याची सुधारणा व्हावी आणि दररोजची पायपीट थांबावी, अशी मागणी करीत आहेत. प्रशासनाने या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या रस्त्याची हद्द निश्‍चित करून रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. अंदाजे चार किलोमीटर अंतराचा हा रस्ता दोन्ही तालुक्‍याच्या आणि आडवळणी ठिकाणी आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून एकाही लोकप्रतिनिधीच्या नजरेस पडला नाही.

दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी हा कच्चा रस्ता पक्‍का करावा, अशी मागणी केली होती. मात्र, अडगळीत पडलेल्या रस्त्याकडे आजतागायत कोणी फिरकले देखील नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्‍त करीत आहेत.

आमच्या गावच्या शेतकऱ्यांना या रस्त्याची फार गरज आहे. ग्रामपंचायत सहकारी संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. प्रशासनाने लक्ष देऊन रस्ता खुला करावा.
-मोहन शिवाजी वाजे, सरपंच, वाजेवाडी.

दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना या रस्त्याची गरज आहे. शेतकरी हा रस्ता तयार होण्यासाठी अनुकूल आहेत. प्रशासनाने लक्ष देऊन आमची रस्त्याची अडचण दूर करावी.
– साधना प्रकाश चौधरी, सरपंच, सिद्वेगव्हाण.

Leave A Reply

Your email address will not be published.