खचलेले रस्ते अन्‌ दरडींचा राडारोडा; उत्तराखंडचे दळणवळण तीन दिवस ठप्पच

तेहरी गढवाल – उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने तेहरी गढवाल जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 94 आणि 58 वर आलेल्या राडारोड्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तेहरी गढवालमधील रस्ते वाहून गेल्यानंतर नागरिक जीव मुठीत धरून पर्यायी रस्त्याचा वापर दळणवळणासाठी करत आहेत. कोत येथे महामार्ग क्र 94चा मोठा भाग वाहून गेला आहे.

ही स्थिती गुरुवारपासून कायम आहे. प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था निर्माण केली नाही, असे सुनील रौतेला यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. पर्वतीय क्षेत्र खूप धोकादायक अवस्थेत आहे. नागरिकांना त्यांच्या ठिकाणापासून दळणवळणात अडथळे येत आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

तेहरी गढवालच्या जिल्हाधिकारी इवा आशिष श्रीवास्तव म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्ग 58 आणि 94 हे बंद आहेत. पर्यायी रस्त्यांची अवस्थाही सध्या अत्यंत वाईट आहे. सध्या एकच मार्ग कार्यरत आहे. हे रस्ते पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावर अधिकारी जातीने हजर राहात आपले प्रयत्न करत आहेत.

फाकोत जवळ रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला आहे. त्याला जोडणाऱ्या रस्त्यांना तडे गेले आहेत. नागिणी येथेही रस्ते खचले आहेत. नरेंद्रनगर येथेही रस्त्यावर दरडीचा राडारोडा आला आहे. यंत्राद्वारे तो दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला चांबा मसुरी महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढल्याने तेथे वाहतुकीची कोंडी झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.