पुणे – गौरी आणि गणपती विसर्जन, त्यातच शनिवार आणि रविवाच्या जोड सुट्टयांमुळे देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. धरणांतील विसर्गामुळे भिडे पूल तसेच नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे मध्यभागातील केळकर रस्ता, नारायण पेठ, शनिवार पेठ परिसरात प्रचंड कोंडी झाली.
शनिवारी सकाळपासून मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली. मोठ्या संख्येने रस्त्यावर आलेल्या वाहनांमुळे केळकर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ परिसरात मोठी कोंडी झाली. नदीपात्रातील रस्ता तसेच भिडे पूल गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली आहे.
डेक्कन तसेच नारायण पेठ भागाला जोडणाऱ्या भिडे पुलाचा वापर दुचाकीस्वार मोठ्या प्रमाणावर करतात. भिडे पुलावरून पाणी वाहत असल्याने केळकर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढला. त्यामुळे केळकर रस्त्याला लागून असलेल्या छोट्या गल्ल्यांमध्ये कोंडी झाली.
याबाबत डेक्कन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर म्हणाले, “नदीतून विसर्ग सुरू असल्याने दोन दिवसांपासून नदीपात्रातील रस्ता आणि भिडे पूल पाण्याखाली आहे. भिडे पूल पाण्याखाली गेल्याने दुचाकीस्वारांना संभाजी पूल वापरण्याची परवानगी देण्यात आल्याने डेक्कन भागातील वाहतूक सुरळीत झाली.’