लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराला संक्रमित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कोणालाही शहरातून बाहेर अथवा बाहेरून शहरात जाता-येता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातून बाहेर जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी वाढवली आहे. यापूर्वी 80 ठिकाणी नाकाबंदी होती. त्यात आणखी 10 ठिकाणे नाकाबंदीसाठी वाढविण्यात आली आहे. तर पाच ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्तांनी रविवारी रात्री शहराला संक्रमित क्षेत्र म्हणून घोषित करणारा आदेश काढला. रविवारी (दि. 19) रात्री 12 ते 27 एप्रिल रात्री 12 पर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. पोलिसांनी देखील नाकाबंदीत वाढ केली आहे. नवीन 10 पॉइंटवर नाकाबंदी लावण्यात आली असून प्रत्येक पॉईंटवर एक अधिकारी, पोलीस ठाण्यात तीन कर्मचारी आणि वाहतूक विभागाचे दोन कर्मचारी असा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची वाहतूक सुरू राहणार आहे.
नाकाबंदीचे होणार ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग”
नाकाबंदी दरम्यान पोलीस ज्या वाहनांना, नागरिकांना तपासतील त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. तसेच यावेळी नागरिकांची चौकशी करताना पोलिसांनी योग्य अंतर ठेवावे, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. अलगीकरण आणि विलगिकरणात ठेवलेले नागरिक बाहेर फिरताना आढळल्यास तात्काळ त्यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले जाणार आहे.