रस्ता कॉंक्रिटीकरणामुळे वाहतूक कोंडी

फुरसुंगी – सार्वजनिक बांधकाम विभागाने सासवड मार्ग ते खडी मशीन चौका दरम्यानच्या कात्रज बाह्यवळण मार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. यामुळे एका समस्येचे निवारण झाले. मात्र, या मार्गावर हांडेवाडी दरम्यान कॉंक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या जड वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा येऊन वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे हडपसर वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर व येथील व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सोलापूर महामार्गावरून शहरात जाणारी सर्व जड वाहतूक हडपसर-गाडीतळमार्गे सासवड मार्गे वळवून मंतरवाडी चौकातून कात्रज बाह्यवळण मार्गावरून वळविल्याने या मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत आहे. त्यात जड वाहनांचा समावेश मोठा आहे. हा मार्ग हांडेवाडी, उंड्री, पिसोळी या दाट लोकवस्तीतून जात असल्याने इतर वाहनांची सुध्दा वर्दळ असते. हांडेवाडी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी बार, अँगल, पाईप व बांधकामाचे लोखंड विक्रेत्यांची गोदामे व दुकाने आहेत. यामधून ट्रकमधून रोज माल घेऊन येतात व जातात. मात्र, या व्यावसायिकांनी या वाहनांसाठी कोठेही पार्किंगसाठी जागा ठेवली नसल्याने ही सर्व वाहने भर रस्त्यातच उभी असतात.

या उभ्या ट्रकमधील लोखंडी साहित्यामुळे अनेकदा जीवघेणे अपघात झाले आहेत. तसेच याठिकाणी अनेक वजनकाटे असून ते देखील रस्त्यालगतच आहेत. त्यामुळे वजन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा भर रस्त्यातच लागत असल्याने वाहतूक कोंडी होऊन रस्तासुध्दा खराब होत आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम खाते किंवा वाहतूक विभागाचे या व्यावसायिकांवर व वाहनांवर कोणतीच कारवाई का करत नाहीत? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हडपसर वाहतूक पोलिसांनी केवळ वाहने अडवून पावत्या फाडण्याऐवजी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या व्यावसायिकांवरसुध्दा कारावाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.