परिसरातील व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम
बॅरिकेट्स काढून पंक्चर पुन्हा सुरू करण्याची मागणी
हडपसर – वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी हडपसर वाहतूक पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर आकाशवाणी समोर बॅरिकेट्स लावून काही महिन्यांपूर्वी पंक्चर बंद केले होते, मात्र सध्या येथील एका मोठ्या खासगी कंपनीने रेलिंग करता येणारे बॅरिकेट्स बसवून त्याला टाळे लावले आहे.
वाहतूक पोलिसांच्या परवानगीवरून हे झाले असले तरी केवळ या कंपनीची वाहने येथून ये-जा करताना हे टाळे काढले जात आहे. कंपनीची वाहने जाताच पुन्हा हे बॅरिकेट्स लावले जात आहेत. त्यामुळे परिसरातील व्यावसायिक यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तेव्हा हे बॅरिकेट्स काढून पंक्चर पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
सोलापूर महामार्गावर रविदर्शन आणि आकाशवाणीदरम्यान सिरम कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या रस्त्याला हे पंक्चर आहे. येथून सिरम कंपनीकडे अधिकारी वर्गाची वाहने तसेच कामगारांना घेऊन जाणाऱ्या कंपनीच्या बसेसची ये-जा असते. याशिवाय आकाशवाणी केंद्राच्या समोर व्यावसायिक इमारती असल्याने येथे रुग्णालय, मेडिकल व इतर व्यावसायिक यांची मोठी दुकाने आहेत. त्यांच्याकडे येणारे रुग्ण आणि ग्राहकांनाही हे पंक्चर सोयीचे आहे.
परंतु, येथे वाहतूक कोंडी आणि अपघात होत असल्याने हडपसर वाहतूक शाखेने सात महिन्यांपासून येथे बॅरिकेट्स लावून हे पंक्चर बंद केले आहे. मात्र, दरम्यानच्या काळात खासगी कंपनीने पोलिसांचे बॅरिकेट्स काढून कायमस्वरुपी आणि रेलिंग करता येणारे लोखंडी बॅरिकेट्स लावले आहेत. त्याला कुलूप घालण्यात आले आहे. कंपनीचे अधिकारी यांची एक गाडी आली तर लगेचच ते कुलूप काढून रस्ता खुला करून दिला जात आहे. वाहन पास झाल्यावर पुन्हा बंद केले जाते आहे.
या खासगी कंपनीचे दोन वॉर्डन हे बॅरिकेट्स उघडून बंद करण्याचे काम करत आहेत. याशिवाय संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत बॅरिकेट्स सरकून ठेवले जात आहेत. 6 नंतर पुन्हा कुलूप घातले जात आहे. यावरून केवळ एका खासगी कंपनीच्या सोयीसाठी हे पंक्चर वापरले जात आहे. तेव्हा कंपनी प्रमाणे आमच्या व्यवसायाचाही विचार करावा आणि पंक्चर खुला ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी किंवा संपूर्ण बॅरिकेट्स हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
“यू’ टर्न सिग्नल नाहीच?
हडपसर आकाशवाणी समोरील व्यावसायिकांना व इतर वाहनचालकांना पुन्हा पंधरानंबर चौकाकडे येण्यासाठी अमरबाग चौक येथील साधना सोसायटीकडे जाणार सिग्नल मिळाल्यानंतर “यू टर्न’ घ्यावा लागतो, त्याचा कालावधी अवघा 24 सेकंद आहे. मात्र, येथे “यू टर्न’चा सिग्नलच नाही.त्यामुळे अनेकांना सिग्नल लक्षात येत नाही, त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी होण्याची घटना वारंवार घडते.