ठरला! किमान समान कार्यक्रम ठरला!!

सत्तास्थापनेत असणारा एक अडथळा दूर

मुंबई : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या 48 तासांत सुरू असणारी चर्चा संपवत किमान समान कार्यक्रम निश्‍चित केल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांकडून प्रभातच्या हाती आली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेत असणारा एक अडथळा दूर झाला आहे.

या किमान समान कार्यक्रमात शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकविमा योजनेचे पुनरावलोकन, बेरोजगारी, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे रखडलेले स्मारक मार्गी लावणे या महत्वाच्या मुद्यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम तीनही पक्षाच्या अध्यक्षांना अंतीम मान्यतेसाठी पाठवण्यात येईल, असे या सुत्रांनी स्पष्ट केले.

हा किमान समान कार्यक्रमाला पक्षाध्यक्षांनी मान्यता दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्यता येईल. दिलेल्या मुदतीत कोणताही पक्ष सरकार बहुमताचा दावा करू न शकल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात बैठकांचा सिलसीला सुरू झाला. त्यातून हा तिढा सोडवण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली आहे. आगामी दोन दिवसांत कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भेट घेणार असून या भेटीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे या पक्षाच्या सुत्रांनी सांगितले.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले असल्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही कॉंग्रेसची किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी काल बैठकही झाली. किमान समान कार्यक्रमाचा मसुदा ठरल्यानंतर त्या मसुद्यावर शिवसेनेसोबत चर्चा करून काही गोष्टींचा त्यात समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर सत्तेतील पदांच्या वाटपाचे सूत्र ठरवण्यात येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितल्याच्या बातम्या काही दैनिकांत (प्रभात नव्हे) आल्या होत्या. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खुलासा केला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या मुद्यावर अजित पवार आणि शरद पवार यांच्या विसंवाद असल्याचे चित्र पूर्णत: काल्पनिक असल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. राष्ट्रवादीला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे ाहे. त्यामुळे पुन्हा सत्ता मिळवता येऊउ शकते, हा कार्यकर्त्यांमध्ये विश्‍वास निर्माण होईल, अशी पक्षाची भूमिका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.