आग्रा : तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह आणखी 11 जणांनी प्राण गमावला. या घटनेने संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात आली. आता या घटनेत मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. शहीद विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यासाठी प्रशासनाने अवघ्या अडीच तासात रस्ता तयार केल्याचं समोर आलं आहे.
पृथ्वीसिंह चौहान यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. या रस्त्यावरून अंत्ययात्रा निघणंही कठीण होतं. त्यामुळे अवघ्या अडीच तासांत प्रशासनानं त्यांच्या घरापर्यंत पक्का रस्ता बनवला आहे.
मागील 12 वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. मात्र आज पृथ्वीसिंह यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणलं जाणार हे समजताच रस्त्यावर डांबर टाकण्यात आलं. त्यांच्या घरापर्यंतचा रस्त्याचं डांबरीकरण झाल्याचं पृथ्वीसिंह यांनी सांगितलं.
दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पृथ्वीसिंह यांच्या घरी जावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आगरा येथील दयालबाग येथे जावून त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यानंतर पृथ्वीसिंह यांच्यावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले.