रस्त्यावरील हमरीतुमरी झाली नित्याची

उमेश सुतार

भुयारी मार्ग होतोय ब्लॉक
मलकापूर फाट्यावर भुयारी मार्गावर दोन्हीही उपमार्गालगत हातगाडा व्यावसायिकांनी ठिय्या मांडला आहे. त्यांच्यात भुयारी मार्गाजवळ गाडे लावण्याची स्पर्धाच लागलेली असते. गाणे लावण्यावरून अनेक वेळा किरकोळ भांडणे होत असल्याने गर्दी होऊन बऱ्याचदा हा भुयारी मार्ग ब्लॉक होत आहे.

कराड  – कराडनंतर मलकापूरला शहराचा दर्जा मिळाल्याने तेथील वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. मलकापूर फाटा परिसरात रस्त्याच्या एका बाजूला हातगाडे तर दुसऱ्या बाजूला रिक्षा या कात्रीत सापडलेल्या पादचाऱ्यांना व वाहनधारकांना रोज कसरत करावी लागत आहे. सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दहा मिनिटाच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. मलकापूरच्या वाहतूक कोंडीबाबत प्रशासनाची चुप्पी का, याबाबत नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

रस्त्याचा एका बाजूला हातगाडे तर दुसऱ्या बाजूला रिक्षा थांबे तयार झाल्याने वाहने चालवायची कशी, असा प्रश्‍न चालकांसमोर आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी युवकांनी अनेक वेळा प्रयत्न केले. मात्र, आता “रोजचं मढं, त्याला कोण रडं’ या म्हणीप्रमाणे या वाहतूक कोंडीकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक घरांमध्ये पाच-पाच वाहने आहेत. मलकापूर फाट्यावर उपमार्गालगत अनेकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. तेथे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वाहने उपमार्गावरच उभी करण्याशिवाय पर्याय नसतो.

उपमार्ग आपल्याच मालकीचा असल्याच्या अविभार्वात काही रिक्षाचालकांनी तेथे अवैध थांबे निर्माण केले आहेत. त्याही पुढे जाऊन काही रिक्षावाले बिनधास्त रस्त्यावरच रिक्षा उभ्या करून त्यात बसलेले असतात. अशा बेजबाबदार चालकांना चाप लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे. या सर्व कारणांमुळे भाजी मंडईसमोर दररोज वाहतूक कोंडी होत आहे.

अशातच एखाद्याने आडमुठेपणाने वाहन रस्त्यातच थांबवल्यास गोंधळात आणखी भर पडते. परिसरात सायंकाळी 5 ते 8 या वेळेत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असली तरी वाहतूक पोलिसांकडून कसलीही कारवाई होत नाही. परिणामी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जण सायंकाळी मलकापूर फाटा व मंडईत जाणे टाळतात. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने मलकापूर नगरपरिषदेने पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.