Road Accident : रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न होताना दिसतात. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही असे मृत्यू रोखण्यासाठी हस्तक्षेप केला आहे. मात्र त्यानंतरही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की,
देशात रस्ते अपघातात दर 10 हजार किलोमीटर अंतरावर 250 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच गेल्या 10 वर्षातील रस्ते अपघातातील मृत्यूची ताजी आकडेवारी समोर आली आहे, जी पाहून धक्का बसेल.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2014 ते 2023 या काळात रस्ते अपघातात सुमारे 15.3 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा आकडा केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
जर आपण गेल्या 10 वर्षात अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमधील रस्ते अपघाताच्या आकडेवारीबद्दल बोललो, तर अमेरिकेत 57, चीनमध्ये 119 आणि ऑस्ट्रेलियात फक्त 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यावरून आपल्या देशातील आकडे अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट होत आहे.
2004 ते 2013 या काळातील रस्ते अपघाताबद्दल बोलायचे झाले तर या काळात 12.1 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. या कालावधीत, देशातील नोंदणीकृत वाहनांची संख्या 2012 मध्ये 15.9 कोटीं होती, पण आता ती 2024 मध्ये अंदाजे 38.3 कोटी झाली आहे.
2012 रस्त्यांची लांबी 48.6 लाख किलोमीटर होती, पण 2019 मध्ये रस्त्यांची लांबी 63.3 लाख किलोमीटरपर्यंत वाढली आहे. मात्र रस्त्यांची लांबी आणि वाहनांची संख्या वाढणे हे दरवर्षी होणाऱ्या अधिकच्या मृत्यूचे कारण असू शकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
तेलंगणातील रस्ते सुरक्षा प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार टी कृष्ण प्रसाद म्हणाले की, आपल्या देशात हत्येला महत्त्व दिले जाते, परंतु रस्ते अपघात आणि सामान्य मृत्यूकडे दुर्लक्ष केले जाते.
रस्ते सुरक्षेबाबत विधेयक आणण्याची योजना आखत असलेले खासदार म्हणाले की, भारतातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपेक्षा एका वर्षात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
जीवघेण्या रस्ते अपघातांच्या बाबतीत कारवाई नाही
दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राने पोलिसांच्या हवालाने माहिती देताना म्हटले की, हत्या झाली असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले जाते, परंतु जीवघेण्या रस्ते अपघातांच्या बाबतीतही अशी कोणतीही कारवाई केली जात नाही.
दिल्लीच्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रस्ते अपघात झाला असेल तर सर्व एजन्सी त्याकडे प्राधान्याने पाहत नाहीत. रस्ते अपघातात डझनभर लोकांचा मृत्यू झाला असेल अशावेळीही वरिष्ठ अधिकारी क्वचितच कनिष्ठांकडून स्पष्टीकरण मागवतात.